अभिनेत्री रिचा चड्ढा तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. रिचा वेगवेगळ्या विषयांवर सोशल मीडियावर तिचं परखड मत मांडत असते. नुकतीच रिचाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये रिचाने बॉलिवूडमधील वास्तविकतेचा पर्दाफाश केलाय.
या पोस्टमध्ये रिचाने बॉलिवूडमधील काही गोष्टींचा खुलासा केलाय. कुणाचंही नाव न घेता रिचाने बॉलिवूडमध्ये तिला आलेल्या अनुभवांचा खुलासा केलाय. यावेळी आपण जेव्हा या क्षेत्रात नवे होतो आणि खुपच निरागस होतो तेव्हा अनेकांनी फायदा उचलल्याचं रिचा म्हणाली आहे. रिचाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, “बॉलिवूडमधील काल्पनिक पत्ता हा वांद्रे ते गोरेगाव असा आहे. इथे काही लोक तुमच्याकडून अशी काही कामं करून घेतील जी तुमच्या आरोग्यासाठी आणि किरअरसाठी हानिकारक आहेत. हे तुमच्यासाठी किती चांगलं आहे हेदेखील ते तुम्हाला पटवून देतील आणि तुमचा त्यांच्यावर विश्वास बसेल. जेव्हा मी निरागस होते तेव्ही मी देखील त्यांच्यावर विश्वास करत होते.” असं रिचा म्हणाली.
बॉलिवूडमधील नेपोटिझमवर देखील रिचा चढ्डाने तिच्या पोस्टमधून निशाणा साधला आहे. “आजवर अनेक पत्रकरांनी नेपोटिझम कशाप्रकारे बॉलिवूडला उद्धवस्त करत आहेत यावर भले मोठे लेख लिहले आहेत. मात्र प्रत्येकवेळी बॉलिवूडमधील बड्या स्टार्सनी या लेखांवर आक्षेप घेतले आहेत. येत्या काळात हे चित्र बदलायचं असेल तर परिस्थितीत बदल घडवून आणणं गरजेचं आहे.” असं रिचा म्हणाली.
मार्च महिन्यात रिचा आणि तिचा बॉयफ्रेण्ड अभिनेता अली फजलने प्रोडक्शन हाउस सुरु केलं आहे. या प्रोडक्शन हाउसची निर्मिती असलेला ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.