भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी भाजपासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत फायदा होईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता सिनेअभिनेत्रींनीही चांगलेच सुनावले आहे. जरा तरी लाज बाळगा, हा काही व्हिडिओ गेम नाही, अशा शब्दांत अभिनेत्री रिचा चड्ढाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा भाजपाला लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात २२ हून अधिक जागा जिंकण्यासाठी फायदा होईल असं येडियुरप्पा म्हणाले. या हवाई हल्ल्यांचा भाजपाला फायदा होईल अशासंदर्भातील मत व्यक्त करताना देशामध्ये मोदी समर्थनाची लाट असून देशातील राजकीय हवा भाजपाच्या बाजूनेच वाहत आहे असंही येडियुरप्पा म्हणाले होते. त्यावर रिचाने संताप व्यक्त करत ट्विट केले, ‘जरा तरी लाज बाळगा. हा काही व्हिडिओ गेम नाही. लोकांचे प्राण गेले आहेत.’
अभिनेत्री रेणुका शहाणेंनीही ट्विटरच्या माध्यमातून येडियुरप्पांवर टीका केली. ‘सीमेवर जवान शत्रूंशी लढा देत असताना, विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना काही लोकांना फक्त मतांमध्येच रस आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तख्त पे चाहे जो भी बैठे वे सुरक्षित है इस बात से की शहीद तो अपने जवान ही होंगे,’ असं ट्विट रेणुका शहाणेंनी केलं आहे.

वादग्रस्त वक्तव्यानंतर येडियुरप्पांनी आपले म्हणणे चुकीच्या अर्थाने घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. ‘माझ्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ घेण्यात आला. मी फक्त सध्या वारे भाजपाच्या दिशेने वाहत असल्याचे म्हटले. हे मी मागील अनेक महिन्यांपासून म्हणत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा कर्नाटकमध्ये २२ जागा जिंकेल हे मी याआधीही म्हटलं आहे,’ असं ते म्हणाले.

Story img Loader