कॉलेज आठवणींचा कोलाज 

ऋचा इनामदार

कॉलेजचा पहिला दिवस आजही माझ्या लक्षात आहे. खूप उत्सुकता आणि थोडी हुरहूरही होती. चर्चगेटमधील के. सी. कॉलेजमध्ये मी सायन्सला प्रवेश घेतला. एकदंरच कॉलेजचं वातावरण मला आवडू लागलं. नवनवीन मित्रमैत्रिणी झाले. आमच्या ग्रुपचं नाव ‘स्माईल्स’ होतं. नावाप्रमाणं आमच्या सगळ्यांच्या चेहरम्य़ावर नेहमीच हास्य असायचं आणि आमच्यामुळे दुसरम्य़ांच्या चेहरम्य़ावरही हास्य फुलायचं. त्यावेळी अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपRमांत मी हिरहिरीनं सहभाग घेत असे. नृत्य, एकांकिका, आंतरमहाविद्यलयीन स्पर्धा, प्रश्नोत्तरांची स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये माझा आवर्जून सहभाग असायचा. याशिवाय के.सी. च्या मराठी मंडळाची सचिव असल्यामुळे त्यासंबंधित अनेक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मी उत्स्फूर्तरित्या सहभागी व्हायचे. तिथूनच माझ्या अभिनयाचा पाया भक्कम होऊ लागला.

बारावीनंतर मी धुळ्यातील ए.सी.पी. एम. डेंटल कॉलेजमध्ये मी बीडीएससाठी प्रवेश घेतला. मुबंईत मोठी झाल्यानं आईबाबांना जरा चिंता होती, की मी तिथे निभावू शकेन का? मात्र मी तिथे मस्त रुळले. तिथेही माझा खूप छान मित्रपरिवार जमला होता. आमच्या या ग्रुपचं नाव ‘एलबीजी’ होतं. अफलातून ग्रुप होता तो (आजही आहे). पाच वर्षं जेव्हा तुम्ही हॉस्टेलमध्ये एकत्र राहता तेव्हा तुमचं ते एक कुटुंब बनतं. त्यामुळे नकळत एक भावनिक नातं तुमच्यात निर्माण होतं. एकमेकांच्या प्रत्येक सुखदु:खात, ताणतणावात तुम्ही सहभागी होता. मला अजूनही आठवतंय आमच्या ग्रुपमध्ये चार जणांना खूप बरं नव्हतं. त्यांना अ‍ॅडमिट केलं आणि आम्ही सगळी मंडळी त्यांची काळजी घ्यायला त्यांच्या बाजूला तत्पर होतो. त्या चार दिवस आमचा ग्रुप होस्टेलवर न राहता हॉस्पिटलमध्ये होता. आजूबाजूच्या लोकांनाही नवल वाटायचं, की चौघांची काळजी घ्यायला १२-१३ जण?

अभ्यास आणि मैत्री, मजा या सगळ्यांची आम्ही योग्य सांगड घातली होती. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांमध्येही मी सहभाग घेत असे आणि विशेष म्हणजे या काळात माझ्या शिक्षकांनी मला कधीच नकार दिला नाही. या काळात मी सुमारे दहा दोन ते तीन अंकी नाटकं केलीत. त्यातील साधारण पाच नाटकांमध्ये माझी प्रमुख भूमिका होती. काही तीन अंकी नाटकांसाठी दिग्दर्शनही केलं. सेट बांधण्यापासून ते रंगवण्यापर्यंतचा सगळा अनुभव मी तेव्हा घेतला. नाटकाची विविध अंग या वेळी मी शिकले आणि एक कलाकार म्हणून मी खूप समृद्ध होत गेले. त्यावेळी बंक करता येत नसल्यानं, सर्व लेक्चर्सना बसून उरलेल्या वेळात मी नृत्याची, नाटकांच्या तालमी करायचे. यात झोपेला रामराम ठोकावा लागे. आम्ही कॉलेजमध्ये खूप धमाल करायचो. वैद्यकीय क्षेत्र असल्यामुळे बंक करून कट्टय़ावर वगैरे आम्ही कधी बसलो नाहीत. परंतु रात्र जागून आम्ही एकत्र अभ्यास करायचो. रात्री कॅन्टीनमध्ये जाऊन चहा प्यायचो, मॅगी खायचो. अनेकदा ट्रेकिंगला जायचो. हरिश्र्च्ंद्रगड, पावसाळ्यात भंडारदरा अशा बरम्य़ाच ठिकाणी आम्ही गेलो आहोत.  तीन-चार बाईक्स आणि एक मारुती ८०० असायची. एका ओळीत त्या बाईक्स आणि त्याच्या मागे आमची गाडी, असा आमचा हा ताफा निघायचा. त्यामुळे पिकनिकच्या खूप छान आठवणी आहेत.

एक धमाल किस्सा ‘फ्रेंडशिप डे’च्या दरम्यान घडला होता. मी आयुष्यात पहिल्यांदा केस रंगवणार होते आणि याची कल्पना मी आईला दिली होती. त्यावेळी आईनं मला मुंबईला आल्यावर केस हायलाईट कर, असं म्हणाली होती. परंतु मला ‘फ्रेंडशिप डे’साठी खास हायलाईट करायचं होतं. मी तिथल्याच एका पार्लरमध्ये गेले. मला आवडलेली शेड मी निवडली. परंतु तिथल्या एका मुलीनं मला, तुम्ही गोरम्य़ा असल्यानं ब्लॉण्ड करण्याचं सुचवलं. चांगली दिसली नाही तर त्याला गडद करू, असंही सांगितलं. म्हणून मी त्यांना होकार दिला. वाघाच्या अंगावर पट्टे असतात तशा तिने सहा बटी रंगवल्या. खूपच भीषण दिसत होतं. मला ते न आवडल्यानं मी तिला ते गडद करण्यास सांगितलं. तिनं दुसऱ्या कोणासाठी तयार केलेला महोगनी एक रंग माझ्या केसांना लावला आणि ते पट्टे केशरी झाले. मी त्या केसांमध्ये केशरी रंगाचा पट्टेरी वाघ दिसत होते. केस खराब होतील या भीतीनं मी आहे तसेच केस ठेवून होस्टेलवर गेले. होस्टेलवर गेल्यानंतर प्रत्येकानं माझ्या केसांच्या रंगाबद्दल विचारलं होतं. दुसऱ्या दिवशी सरांना भेटायला जाताना माझ्या त्या बटा इतर केसांमध्ये लपवून केस बांधले होते. त्यांनतर मी मुंबईला आल्यावर बाबांनी आधी केसांचा रंग बदलण्यास सांगितलं. तेव्हा मी कानाला खडा लावला, की आयुष्यात पुन्हा कधी केसांना रंग नाही लावायचा. परंतु आता कामाच्या निमित्तानं केस रंगवावेच लागतात.   कॉलेजचे दिवस माझ्यासाठी खूप खास होते.  के. सी. कॉलेज सोडून जेव्हा वैद्यकीय कॉलेजला जात होते, तेव्हा खूपच वाईट वाटत होतं आणि माझ्यापेक्षाही माझ्या मित्रमैत्रिणींना जास्त वाईट वाटलं होतं. तरीही भविष्याच्या दृष्टीनं तिथं जाणं गरजेचंही होतं. मात्र धुळ्याला गेल्यावर ते कॉलेजही माझ्यासाठी खूप खास झालं. कॉलेजचा शेवटचा  दिवस मात्र आमच्यासाठी ढसाढसा रडवणारा होता. कित्येक दिवसांचे घट्ट भावबंध सोडून आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो.

शब्दांकन : मितेश जोशी

Story img Loader