Grammy Awards 2023: ग्रॅमी हा संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे. यंदाचा ६५ वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा अमेरिकेमधील लॉस एंजेलिस शहरामध्ये पार पडला. संगीत विश्वामधील अनेक मान्यवरांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सध्या भारतीय संगीतकार रिकी केज यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
रिकी केज यांना त्यांच्या ‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बमला ‘बेस्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम’ हा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. रॉक-लेजेंड स्टीवर्ट कोपलँड यांच्यासह मिळून त्यांनी या अल्बमची निर्मिती केली होती. तिसऱ्यांदा ग्रॅमी जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. २०१५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा या प्रतिष्ठित पुरस्कारावर नाव कोरले होते. तेव्हा ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ या विभागामध्ये त्यांच्या ‘विंड्स ऑफ संसार’ या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर गेल्या वर्षी २०२२ मध्ये त्यांनी दुसऱ्या ग्रॅमी पुरस्काराची कमाई केली होती. त्यांनी केलेल्या या विक्रमामुळे जगासमोर सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.
नुकतेच त्यांनी या सोहळ्यामधील काही फोटो ट्विटरवर पोस्ट केले. त्यांनी या फोटोंना ”मला नुकताच तिसरा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. माझ्या भावना सध्या मला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाहीयेत. मी सर्वांचा ऋणी आहे. हा पुरस्कार मी माझ्या भारत देशाला समर्पित करत आहे” असे कॅप्शन दिले आहे. त्यांनी शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘डिव्हाइन टाइड्स’ या अल्बममध्ये एकूण नऊ गाणी आणि आठ म्युझिक व्हिडीओंचा समावेश आहे. या म्युझिक व्हिडीओंमध्ये जगभरामधील नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाण्यांची प्रेरणा पर्यावरणाकडून येत असल्याचे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे. त्यांच्या ‘शांती संसार’ आणि ‘अर्थ लव्ह’ या अल्बम्समध्येही त्यांची पर्यावरणाबद्धलची ओढ प्रकर्षाने जाणवते.