अलिकडेच लंडनमध्ये पार पडलेल्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये सोनाक्षी सिन्हाने परिधान केलेला स्टेज आऊटफीट फॅशन डिझायनर रिद्धी आणि सिद्धी या जोडीने तयार केला आहे. सोनाक्षीने परिधान केलेल्या या ड्रेसला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच, परंतु सोनाक्षीलादेखील तो तितकाच आवडला. गोव्याच्या या डिझायनर जोडीने सोनाक्षीसाठी पॅचवर्क केलेले डेनीम जॅकेट तयार केले होते. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, सोनाक्षीने परिधान केलेल्या आमच्या पोशाखाने गर्दीचे लक्ष वेधून घेतले. तसेच, सोनाक्षीलासुद्धा हा ड्रेस खूप आवडला. यावेळी तिला अनोखा तरीही ग्लॅमरस असा पोशाख डिझाईन करून हवा होता. सोनाक्षी आणि तिची स्टायलिस्ट साक्षी मेहराबरोबर काम करायला आम्हाला नेहमीच आवडते. सोनाक्षीला कोणता ड्रेस चांगला दिसेल, हे साक्षीला चांगले माहिती असते. खूप साऱ्या चर्चेनंतर आणि विविध कल्पनांवर विचार केल्यावर वाघाच्या कातड्याप्रमाणे डिझाईन असलेल्या पॅचवर्कच्या डेनिम जॅकेटवर आमचे एक मत झाले. यावर आम्ही खूप बारकाईने काम केले आहे. मौल्यवान रत्नांनी आणि पॅचवर्कने सजलेले हे जॅकेट खचितच सुंदर दिसत असल्याचेदेखील त्या म्हणाल्या. कतरिना कैफ आणि इलियाना डिक्रुझसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांसाठी काम केलेल्या रिद्धी आणि सिद्धीने सोनाक्षीसाठीचा हा स्टेज आऊटफिट डिझाईन करताना खूप आनंद वाटल्याची भावना व्यक्त केली.
 

Story img Loader