उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी व त्यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला आजपासून जामनगरमध्ये सुरुवात झाली आहे. तीन दिवसांच्या या सोहळ्यासाठी जगभरातील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या प्री-वेडिंग सोहळ्यात आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना परफॉर्म करणार आहे. रिहाना या सोहळ्यासाठी गुरुवारी जामनगरमध्ये पोहोचली आहे.
जामनगरमध्ये प्री-वेडिंग कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून आजपासून तीन दिवस विविध प्रकारचे परफॉर्मन्स होतील. यामध्ये रिहानासह, भारतीय गायक अरिजीत सिंह, बी प्राक, दिलजीत दोसांझ व मराठमोळे अजय -अतुलही सादरीकरण करतील. या कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत ती जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार, गायिका आहे. नऊ ग्रॅमी अवॉर्ड्स, 12 बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स आणि सहा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत. आज आपण रिहानाची एकूण संपत्ती किती, ते जाणून घेणार आहोत.
रिहानाची संपत्ती
‘इंडिया टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रिहाना तिची गाणी, ब्यूटी ब्रँड, अंतर्वस्त्राचा ब्रँड आणि म्युझिक टूर्समधून मोठी कमाई करते. याशिवाय ती इन्स्टाग्राम पोस्ट व गाण्यांच्या रॉयल्टीमधूनही पैसे कमावते. ‘फोर्ब्स’च्या रिपोर्टनुसार, रिहानाची एकूण संपत्ती ११,००० कोटी रुपये आहे. ती सर्वात श्रीमंत महिला संगीतकार आहे.
म्युझिक टूर्समधून होणारी कमाई
‘लास्ट गर्ल ऑन अर्थ टूर’, ‘लाऊड टूर’, ‘डायमंड्स वर्ल्ड टूर’ यांसारख्या रिहानाच्या टूर लोकप्रिय आहेत. तसेच ती एमिनेम यांच्यासह केलेल्या कोलॅबरेशनमधून शेकडो दशलक्ष डॉलर्सची कमाई करते. २०१३ मधील रिहानाची डायमंड्स वर्ल्ड टूर अत्यंत फायदेशीर ठरली होती. या टूरमधून तिने अंदाजे ११०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. २०१४ मध्ये रिहानाने रॅपर एमिनेमसह एक टूर केला होता. फक्त सहा शो असूनही या टूरमधून त्यांनी सुमारे २९८ कोटी रुपये कमावले होते.
रिहानाचा ब्यूटी ब्रँड
फेंटी नावाच्या ब्यूटी ब्रँडची सुरुवात रिहानाने २०१७ मध्ये केली होती. हा ब्रँड प्रचंड लोकप्रिय आहे. या ब्रँडचे २०२१ मधील एकूण मूल्य २३,००० कोटी रुपये असल्याचं फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.
अंतर्वस्त्राच्या ब्रँडची मालकीण आहे रिहाना
रिहानाने २०१८ मध्ये अंतर्वस्त्र ब्रँड Savage x Fenty लाँच केला होता. या ब्रँडला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून त्याचे एकूण मूल्य 270 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच २२३८ कोटी रुपये आहे. या ब्रँडचे सुरुवातीचे पूर्ण कलेक्शन अवघ्या एका महिन्यात विकले गेले होते. या ब्रँडच्या माध्यमातून रिहाना मोठी कमाई करते.
इन्स्टाग्राम पोस्टमधून कमाई
रिहानाचे इन्स्टाग्रामवर १५२ मिलियन फॉलोअर्स आहेत. हॉपर एचक्यूनुसार, रिहाना इन्स्टाग्रामवरील प्रत्येक स्पॉन्सर्ड पोस्टसाठी ९१४,००० डॉलर्स म्हणजेच अंदाजे सात कोटी रुपये घेते.
Photo : अनंत अंबानीपेक्षा मोठी आहे राधिका मर्चंट, दोघांच्या वयात आहे तब्बल ‘एवढे’ अंतर
गाण्यांची रॉयल्टी
रिहानाला ‘२०२३ सुपर बाउल’मथील हाफटाइम परफॉर्मन्ससाठी पैसे मिळाले नव्हते, पण तरीही तिने मोठी रक्कम मिळवली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार, रिहानाने स्पॉटिफायवर तिच्या गाण्यांच्या व्ह्यूजमधूल अंदाजे ८० लाख रुपये कमावले होते. हाफटाइम शोनंतर, स्पॉटिफायवर तिची गाणी ऐकणाऱ्या लोकांची संख्या ६४० टक्क्यांनी वाढली होती.