‘अनफेथफुल’ या गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आलेली रिहाना पाश्चिमात्य संगीत क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणून ओळखली जाते. जगभरात कोटय़वधी चाहते असलेली रिहाना आज मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय चेहरा आहे आणि तिच्या याच लोकप्रियतेचा गैरवापर केल्याचा आरोप तिने आपल्या वडिलांवर केला आहे.

रिहानाच्या वडिलांचे नाव रोनाल्ड फेन्टी आहे. २०१५ साली त्यांनी ‘फेन्टी’ नामक एका सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या कंपनीची स्थापना केली होती. प्रचंड गुंतवणूक, योग्य नियोजन, विक्री कौशल्य व व्यावसायिक अनुभवाच्या जोरावर या कंपनीने अल्पावधीतच घवघवीत यश मिळवले. हे यश इतके प्रचंड होते की, त्यामुळेच पुढे रिहाना व तिच्या वडिलांमध्ये व्यावसायिक संघर्षांची ठिणगी पेटली.

रिहानाचे संपूर्ण नाव रॉबिन रिहाना फेन्टी आहे. काही वर्षांपूर्वी तिनेदेखील एका सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या कंपनीची स्थापना केली होती. योगायोग म्हणजे तिच्या कंपनीचे नावदेखील ‘फेन्टी’ होते. रोनाल्ड फेन्टी यांनी तिला विश्वासात न घेता तिच्या कंपनीचे नाव आपल्या कंपनीला दिले. तिच्या कंपनीत तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनाची हुबेहूब नक्कल केली. दरम्यान, त्यांनी आपल्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीत तिचे फोटोदेखील वापरले आणि या संदर्भात वडिलांनी तिला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. रोनाल्ड फेन्टी यांनी आपल्या लोकप्रियतेचा गैरवापर करत कोटय़वधींचा घोटाळा केला आहे, असा आरोप रिहानाने वडिलांवर के ला आहे. तसेच रिहाना निव्वळ आरोप करून शांत बसली नाही तर तिने वडिलांविरोधात थेट कोर्टात धाव घेतली आहे.

रोनाल्ड फेन्टी यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी रिहानाच्या कंपनीचे नाव चोरले नाही, तर त्यांना आपल्या आडनावावरून ‘फेन्टी’ हे नाव सुचले होते. तसेच एकसारखे दिसणारे, समान दर्जा असलेले लाखो सौंदर्य प्रसाधने जगभरात आहेत, त्यामुळे तिच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. शिवाय तिला विश्वासात घेऊनच तिचे फोटो जाहिरातीत वापरले गेले होते आणि त्यासाठी कंपनीने तिला लाखो रुपये दिले होते, परंतु माझ्या कंपनीची विश्वासार्हता डळमळीत करण्यासाठी केवळ सूडबुद्धीने तिने हे आरोप केले आहेत, असा उलट दावा रोनाल्ड फेन्टी यांनी केला आहे.

Story img Loader