नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनया व्यतिरिक्त संकर्षणच्या कविता आणि त्याचं उत्कृष्ट सूत्रसंचालन या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात. सध्या अभिनेत्याचं ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ ही नाटकं आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. संकर्षणच्या या कलाकृतींना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
नुकताच अकलूजला संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचा प्रयोग झाला. या प्रयोगाला अकलूजची प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरुने खास हजेरी लावली होती. रिंकूने तिच्या आई-बाबांसह संकर्षणचं हे नाटक पाहिलं. यासंदर्भात संकर्षणने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींचे ‘नाच गं घुमा’वर रील करण्यासाठी अथक प्रयत्न, पाहा व्हिडीओ
संकर्षणने रिंकूसह फोटो शेअर करत लिहिलं आहे, “काल अकलूजचा प्रयोग जोरदार झाला. प्रेक्षकांचा खूप अप्रतिम प्रतिसाद मिळाला. ऑलमोस्ट हाउसफूल होता आणि काल प्रेक्षकांमध्ये स्पेशल गेस्ट पण होती…रिंकू राजगुरू. मी अकलूजला येतोय म्हणल्यावर स्वतःहून नाटकाला येते म्हणाली, “माझ्या शहरात तुझं स्वागत आहे. शहरात काहीही लागलं तरी हक्काने सांग,” असं म्हणाली. आई बाबांना घेऊन आली…प्रयोग पाहून हसली, रडली, कौतुक करुन गेली…”
“तिचा सैराट आला तेव्हा ‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये पाहूणी म्हणून आली आणि आमची ओळख झाली. आता चांगले चांगले सिनेमे करते…लोकप्रियता तर काय विचारायलाच नको…पण तरीही स्वतःहून कळवून, येऊन, भेटून, विचारपूस करुन कौतुक करुन गेली आणि विशेष म्हणजे ‘मी पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले ती तुझ्यासोबत ‘खवय्ये’मध्ये असं पण म्हणाली…छान वाटलं…या सगळ्या तिच्या वागण्या बोलण्यात शांतता, स्थिरता, समजूतदारपणा आणि प्रवासाची जाणीव होती…वचवच, माज , नखरे काही नाही…थँक्यू रिंकू…तुला खूप शुभेच्छा..भेटत राहू आणि हो सगळ्यात आनंदी चेहरे झाले ते आमच्या बॅकस्टेज कलाकारांचे…त्यांच्या मनांत एकच भाव होता… ‘आरची आली आरची’,” असं संकर्षणने लिहिलं आहे.
हेही वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराने सुरू केलं नवं हॉटेल, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते झालं उद्घाटन
दरम्यान, संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकात अभिनेत्री अमृता देशमुख, प्रसाद बर्वे आहे. या नाटकाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं आहे.