ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊनसुद्धा ‘कांतारा’ची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. उलट आणखी जास्त या चित्रपटाविषयी बोललं जात आहे. बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटाने इतिहास रचलाच आहे. आता ओटीटी विश्वातही या चित्रपटाचं कौतुक पाहायला मिळत आहे. अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टीचं सगळेच कौतुक करत आहे. नुकतंच रिषभने त्याचा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.
नेटफ्लिक्सवर ‘कांतारा’ हिंदीमध्ये उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सच्याच अधिकृत यट्यूब अकाऊंटवर रिषभ शेट्टीचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रिषभ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे किस्से शेअर करत आहे. खासकरून चित्रपटाच्या क्लायमॅक्सदरम्यानचा जो फाईट सीन आहे त्याविषयी रिषभने खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “अवतार चित्रपटाचं नाव मी…” जेव्हा ‘या’ वक्तव्यामुळे गोविंदा झालेला चांगलाच ट्रोल
याविषयी बोलताना रिषभ म्हणाला, “गुलिगा सीनच्या आधी एका सीनमध्ये सगळे मला मशाली हातात घेऊन मारत आहेत. त्या सीनदरम्यान माझ्या पाठीला प्रचंड भाजलं होतं, खरचटलं होतं, पण आधीच बजेट बरंच वाढल्याने तो सीन वेळेत शूट करणं यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. व्हीएफएक्स किंवा बॉडी डबल वापरला असता तर ते तेवढं खरंदेखील वाटलं नसतं आणि तेवढा पैसा आणि वेळ दोन्ही आमच्याकडे नव्हतं. तो सीन करताना मी प्रचंड वैतागलो होतो, तेव्हा जर तो सीन करताना कुणी माझ्यामध्ये आलं असतं किंवा अडचण आली असते तर मी खरंच कुणालातरी जीवे मारलं असतं. मी तेवढा हिंस्त्र झालो होतो जे तुम्ही चित्रपटात अनुभवलंही असेल.”
शिवाय हा सीन करताना त्याच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या, त्यानंतरच्या सीनमध्ये रिषभ केवळ लुंगी परिधान करून होता तेव्हासुद्धा त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी फोड आले होते. या व्हिडिओमध्ये रिषभने असेच काही किस्से सांगितले आहेत. ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटीची कमाई केली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘केजीएफ चॅप्टर २’नंतर ‘कांतारा’चं नाव घेतलं जात आहे.