कांतारा चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टीने २०१८ मध्ये ‘किरीक पार्टी’ नावाचा एक चित्रपट बनवला होता. या चित्रपटातून अभिनेत्री रश्मिका मंदानाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाने रश्मिकाला स्वतःची वेगळी ओळख दिली. पण मागच्या काही काळापासून रश्मिका आणि रिषभ शेट्टी यांच्यात वाद सुरू असल्याचं दिसून येत आहे. रिषभने चित्रपटसृष्टीत ६ वर्ष पूर्ण केल्यानंतर इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रश्मिकाला टॅग न केल्यानंतर याची सुरुवात झाली. त्यानंतर रश्मिकानेही एका मुलाखतीत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले मात्र रिषभ शेट्टीचं नाव घेतलं नाही. आता यावर रिषभ शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे.
रश्मिका मंदानाने तिच्या करिअरबद्दल बोलताना रिषभ शेट्टी आणि रक्षित शेट्टीचं नाव घेतलं नव्हतं. आता यावर रिषभ शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. रश्मिकाने काही आठवड्यांपूर्वीच तिचा पहिला चित्रपट ‘किरीक पार्टी’च्या यशावर भाष्य केलं होतं. पण यावेळी तिने प्रॉडक्शन हाऊसचं नाव घेतलं नाही. तसेच रिषभ शेट्टीबद्दलही ती काहीच बोलली नाही. रिषभ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यामुळे अनेक चाहत्यांनी हे अपमानकारक असल्याचं म्हटलं होतं आणि रश्मिकाला चांगलंच सुनावलं होतं.
रिषभ शेट्टीने रश्मिका मंदानाची कमेंट आणि त्यावर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया यावर आपलं मत स्पष्ट केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी विचारण्यात आल्यानंतर रिषभ शेट्टी म्हणाला, “त्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. अनेक कलाकारांना आम्ही या क्षेत्रात घेऊन येतो. अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही संधी दिल्या आहेत. ते या लिस्टमध्ये कायमच राहतील. यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही.”
आणखी वाचा- कलाकारांचा तिरस्कार करणाऱ्यांना रश्मिका मंदानाचं चोख उत्तर; म्हणाली, “आम्ही सेलिब्रिटीज आहोत…”
याशिवाय रिषभने रश्मिकाच्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “कलाकारांची निवड ही स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर केली जाते. अशा टाइपच्या अभिनेत्री मला अजिबात आवडत नाही. मला त्यांची गरज नाही, मला नव्या कलाकारांबरोबर काम करायला आवडतं. कारण ते जेव्हा या क्षेत्रात येतात तेव्हा त्यांच्या कोणत्याही मर्यादा नसतात.”