राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘मेरा नाम जोकर’ १९७० मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात मुख्य पात्र साकारत असताना त्यांनी पात्राच्या किशोरवयीन भूमिकेसाठी ऋषी कपूर यांची निवड केली. त्याआधी ‘श्री ४२०’ मध्ये ऋषी कपूर यांनी लहानशी व्यक्तिरेखा साकारली होती. त्या वेळी ते फक्त ३ वर्षाचे होते. ‘मेरा नाम जोकर’ फ्लॉप झाल्यानंतर राज यांनी ऋषी आणि डिंपल कपाडिया यांची जोडी घेऊन ‘बॉबी’ हा चित्रपट बनवला. ‘बॉबी’ चित्रपट खूप चालला. या सुपरहिट चित्रपटामुळे ऋषी कपूर सुपरस्टार झाले. त्यांनी शंभरपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बॉबीनंतर ऋषी कपूर यांचा ‘झेहरिला इंसान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ते पहिल्यांदा नीतू यांना भेटले. ऋषी कपूर- नीतू या जोडीने ‘रफ्फू चक्कर’, ‘जिंदा दिल’, ‘खेल खेल में’, ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘दुसरा आदमी’ अशा काही चित्रपटांमध्ये काम केले. एकत्र काम करता-करता ते दोघेही प्रेमात पडले. काही वर्षांनंतर त्यांनी लग्न केले. ऋषी आणि नीतू यांनी तब्बल बारा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘बेशरम’ या चित्रपटामध्ये ते त्यांच्या मुलासह, रणबीर कपूरसह ऑनस्क्रीन दिसले होते.
आणखी वाचा- ‘ब्रह्मास्त्र’ करणार का ‘लाल सिंग चड्ढा’पेक्षा जास्त कमाई? एका दिवसात विकली गेली ‘इतकी’ तिकिटं

२०२० मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांना ‘ल्यूकेमिया’ हा आजार झाला होता. ल्यूकेमिया झालेल्या व्यक्तीच्या शरीरात रक्त गोठल्याने रक्तप्रवाह थांबतो. त्या आधी दोन वर्षांपासून ऋषी कपूर ब्लडकॅन्सरचा सामना करत होते. या महाभयंकर आजाराच्या उपचारासाठी ते परदेशीही गेले होते. २०२० मध्ये मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. ४ सप्टेंबर रोजी ऋषी कपूर यांचा वाढदिवस असतो. त्यांच्या ७०व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांची पत्नी नीतू यांनी त्या दोघांचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे.

नीतू यांनी पोस्ट केलेल्या फोटोला त्यांनी ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे कॅप्शन लिहिले आहे. दोघे पार्टीच्या मूडमध्ये असल्याचे या फोटोमधून दिसून येत आहे. ऋषी यांनी भला मोठा चष्मा लावला आहे. नीतू यांनी गळ्यात रंगीबेरंगी पंखांची माळ घातलेली असून त्यांचा हात ऋषी यांच्या मानेभोवती आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. या फोटोला आतापर्यंत बऱ्याच जणांनी लाईक केले आहे. चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी फोटोखाली कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader