ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन झालं आहे. या निधनाने त्यांच्या अनेक आठवणी ताज्या केल्या आहेत. अशीच एक आठवण म्हणजे ‘बॉबी’ या सिनेमाची. या सिनेमानं राज कपूर यांचं अवघं साम्राज्य तारलं होतं. अनेकांना वाटतं की बॉबी हा ऋषी कपूर यांचा पहिला सिनेमा. मात्र त्याआधी ऋषी कपूर एका सिनेमात झळकले होते. त्याचं नाव होतं ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमाचे नायक होते राज कपूर. मात्र या सिनेमात राज कपूर यांची म्हणजेच ‘राजू’ची लहानपणीची भूमिका साकारली होती ऋषी कपूर यांनी.
काय घडलं होतं तेव्हा?
‘मेरा नाम जोकर’ या सिनेमासाठी राज कपूर यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं होतं. एका सर्कशीत काम करणाऱ्या जोकरची ही शोकांतिका होती. अत्यंत मन लावून राज कपूर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी अक्षरशः आर. के. स्टुडिओही गहाण ठेवला होता. मात्र इतकं सगळं होऊनही सिनेमा तिकिटबारीवर आपटला. समीक्षकांनी धोपटला. १९७० मध्ये आलेला हा पहिला हिंदी सिनेमा होता ज्यामध्ये दोन इंटरव्हल होते. या सिनेमाला लोकांचा इतका विरोध झाला की आर. के. स्टुडिओच्या बाहेर राज कपूर यांचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला. खरं तर राज कपूर यांच्या उत्कृष्ट सिनेमांपैकी एक म्हणावा असा हा सिनेमा आहे. मात्र तो तिकिटबारीवर त्याची जादू चालवू शकला नाही. त्यानंतर हा सिनेमा राज कपूर यांनी सोव्हिएत युनियनमध्ये प्रदर्शित केला. तिथल्या लोकांना तो आवडला.
राज कपूर, सिम्मी गरेवाल, मनोज कुमार, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, दारा सिंग, पद्मिनी, ओम प्रकाश, राजेंद्र नाथ आणि एडुअर्ड स्जेरेदा ही रशियन सर्कस स्टार होती. सुमारे ६ वर्षे राज कपूर या सिनेमावर काम करत होते. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर हिट होईल असं त्यांना वाटलं. मात्र प्रत्यक्षात सिनेमा आपटला त्यामुळे राज कपूर कर्जबाजारी झाले. त्यांचं सगळं बजेट कोलमडलं. तगडी स्टार कास्ट, सिम्मी गरेवाल यांचा बिकिनी सीन, दमदार गाणी, अभिनय इतकं सगळं असूनही हा सिनेमा चालला नाही. मात्र हे सगळं अपयश बॉबी सिनेमाने धुऊन काढलं.
‘बॉबी’ने धुऊन काढलं ‘मेरा नाम जोकर’चं अपयश
आता आपण काय करायचं ? या विवंचनेत राज कपूर होते. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला अर्थात ऋषी कपूरला घेऊन ‘बॉबी’ हा सिनेमा बनवला. ऋषी कपूर आणि डिंपल या दोघांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. प्राण, अरुणा इराणी, प्रेमनाथ हे सगळे कलाकार साथीला होतेच. हा सिनेमा १९७३ मध्ये आला आणि सुपरहिट ठरला. त्या काळातल्या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये बॉबीची गणना होते. श्रीमंत घरातला मुलगा आणि गरीब घरातली मुलगी यांची प्रेमकहाणी या सिनेमात चित्रीत करण्यात आली होती. बॉबी अर्थात डिंपलचे कपडे, बॉबी सिनेमात ऋषी कपूरने वापरलेली बाईक या सगळ्याची फॅशन आणि ट्रेंड पुढची काही वर्ष टीकून होता. इतका हा सिनेमा यशस्वी ठरला. या सिनेमाने त्या काळात ३० कोटी रुपयांची कमाई केली.
या सिनेमाचा अजून एक मोठा प्लस पाॅईंट ठरला तो म्हणजे यातली गाणी. ‘मै शायर तो नहीं’, ‘मुझे कुछ कहना हैं’, ‘हम तुम इक कमरेंमें बंद हो’, ‘झूठ बोले कौआ काटे’ ही गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत.
त्या काळात मोठे स्टार घेऊन सिनेमा करणं हे राज कपूर यांना शक्य झालं असतं ते हिट सिनेमा बनवू शकले असते. मात्र ‘टिनेज लव्हस्टोरी’ बनवायची असा विचार राज कपूर यांनी केला. त्यातून जन्माला आली बॉबीची कथा. ख्वाजा अहमद अब्बास यांनी या सिनेमाची कथा लिहिली होती. २१ वर्षांचा ऋषी कपूर आणि १६-१७ वर्षांची डिंपल यांची ही प्रेमकथा लोकांना चांगलीच भावली आणि ऋषी कपूर रातोरात स्टार झाले..आणि अशा रितीने या सिनेमामुळे ऋषी कपूर यांच्या वडिलांचं म्हणजेच राज कपूर यांचं साम्राज्य अबाधित राहिलं.