नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका एखाद्या कलाकारासाठी खरोखरच मोठे आव्हान असते. खरा कलाकार अशा भूमिकेच्या शोधातही असतो. बॉलीवूडच्या प्रेक्षकांसाठी अगोदर नायक आणि नंतर चरित्र अभिनेता अशी ओळख असलेला ऋषी कपूर आता लवकरच एका वेगळ्या ‘लुक’मध्ये दिसणार आहे. ऋषी कपूरचे हे वेगळे रूप ‘सनम रे’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तो या चित्रपटात ८० वर्षांच्या वृद्धाची भूमिका करत आहे.
‘बॉबी’ चित्रपटाद्वारे नायक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. ऋषी कपूरने डिम्पल कपाडिया ते श्रीदेवी आदी अभिनेत्रींबरोबर काम केले. मात्र नीतू सिंगबरोबरची पडद्यावरील त्याची जोडी प्रत्यक्ष जीवनातही जमली. या दोघांचा मुलगा रणबीर यालाही बॉलीवूडमध्ये नायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. मात्र कलाकार म्हणून ऋषी कपूर आजही अभिनय करतो आहे. ‘ऑल इज वेल’ या चित्रपटात तो नुकताच अभिषेक बच्चन याच्याबरोबर पडद्यावर पाहायला मिळाला होता. अभिनेता आणि चांगला नर्तक अशी ख्याती असलेला ऋषी कपूर ‘सनम रे’ या आगामी चित्रपटात ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.
प्रामुख्याने ‘रोमँटिक नायक’ अशी ओळख असलेल्या ऋषी कपूरने ‘अग्निपथ’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये प्रेक्षकांना वेगळ्या रूपात दर्शन दिले होते. आता ऋषी कपूरच्या चाहत्यांसाठी ‘सनम रे’ चित्रपटातील त्याची ही भूमिका नक्कीच धक्कादायक असणार आहे. स्वत: ऋषी कपूरने याबाबत ‘ट्विट’ करून ही माहिती दिली आहे. ही भूमिका अधिकाधिक वास्तव व्हावी, यासाठी ऋषी कपूर गेल्या काही दिवसांपासून दररोज चार ते पाच तास या भूमिकेच्या वेषभूषेत वावरत असल्याचे सांगण्यात येते. चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्या खोसला कुमार यांचे आहे.

Story img Loader