डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमची नक्कल केल्याप्रकरणी अटक करून नंतर सोडून देण्यात आलेल्या किकू शारदा या विनोदी कलाकाराची पाठराखण ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांनी केली आहे. मी राम रहीमची व्यक्तिरेखा साकारीन आणि पाहतो मला कोण अटक करतो ते, असे आव्हानदेखील त्यांनी दिले आहे. चित्रपटात मी या रॉकस्टारची (डेरा प्रमुख) भूमिका साकारेन. पाहतो मला कोण तुरूंगात टाकतो ते. किकू शारदा तू काम करत राहा, असा संदेश त्यांनी किकूच्या समर्थनार्थ राम रहीमच्या छायाचित्रासह टि्वटरवर पोस्ट केला आहे.
फराह खान, कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि वीर दाससहीत अनेकांनी किकूच्या अटकेबाबत खंत व्यक्त केली आहे. हरियाणा पोलिसांसाठी ही शर्मेची गोष्ट असून, अशा प्रकारच्या कारवाईमुळे देशात हुकूमशाही राजवट असल्याचा भास होत असल्याची टीका काँग्रेसने केली. किकूसारख्या विनोदी कलाकाराला अटक करण्यापेक्षा त्याला पुरस्कार प्रदान करावा, अशी भावना काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी व्यक्त केली. गंभीर गुन्हा करणारे राजरोस फिरतात, तर मिमिक्री करणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते. किकू शारदाची अटक म्हणजे न्याय व्यवस्थेचा धाक नसणारी घटना असून, एखाद्या हुकूमशाही राजवटीत राहत असल्यासारखे वाटते, अशा प्रकारचे टि्वट त्यांनी पोस्ट केले आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमची नक्कल करून धार्मिक भावना भडकविल्याच्या तक्रारीवरून बुधवारी हरियाणा पोलिसांनी किकू शारदाला अटक केली होती.

Story img Loader