राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र व अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया मागील काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मालकीच्या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. रितेश आणि जिनिलिया यांच्या ‘देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीसंदर्भात हा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणात रितेश आणि जिनिलिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सहकार विभागाने रितेश आणि जिनिलिया यांना क्लीन चिट दिली आहे. सहकार विभागाने याबाबतचा अहवाल सादर केला असून यात रितेश आणि जिनिलिया यांना क्लीन चिट दिली आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी बीपीन शर्मा या प्रकरणी चौकशी करत होते.
नेमकं प्रकरण काय?
भाजपाच्या स्थानिक नेत्याने रितेश आणि जिनिलिया यांची मालकी असलेल्या ‘देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. या कंपनीला देशमुख कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या बँकांकडून तातडीने कर्ज कसं मिळालं? अगदी महिन्याभराच्या कालावधीमध्ये एमआयडीसीमध्ये या कंपनीला जमीन कशी मंजूर करण्यात आली? १६ उद्योजकांना डावलून रितेश आणि जिनिलियाच्या कंपनीला प्राधान्य का देण्यात आलं? असे अनेक प्रश्न भाजपाने उपस्थित केले आहेत.
भाजपाच्या या आरोपानंतर चौकशी करण्यात आली. लातूर एमआयडीसीच्या भूखंड चौकशी अहवालात जिल्हा उपनिबंधकांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. त्रिसदस्यीय समितीने या प्रकरणी चौकशी पूर्ण केली असून कंपनीशी संबंधित कोणतीही अनियमितता आढळून आली नाही, असा अहवाल दिला आहे. यामध्ये रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी क्लीन चिट दिली आहे.