अभिनेता रितेश देशमुखने अभिनयक्षेत्रात उत्तम कामगिरी करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट रितेशने दिले. रितेश फक्त बॉलिवूड पुरता मर्यादित राहिला नाही. त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. ‘लय भारी’ हा त्याचा पहिला मराठी चित्रपट. आता रितेशने नवी सुरुवात केली आहे. त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. रितेशने आषाढी एकादशीनिमित्त खास पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.
आणखी वाचा – VIDEO : ती आली, घट्ट मिठी मारली अन्…; मुंबई विमानतळावर आलिया भट्टला मिळालं खास सरप्राईज, पाहा व्हिडीओ
‘वेड’ असं रितेशच्या या नव्या चित्रपटाचं नाव आहे. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा देत रितेशने मराठी चित्रपटाची घोषणा केली. तसेच या चित्रपटाबाबात काही खास गोष्टी त्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. रितेश म्हणाला, “आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की, मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे. पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी लई भारी साथ दिली होती. आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटात आणखी एक वेड लावलं आहे.”
आणखी वाचा – “माझ्या पतीसह आम्ही सगळेच नशेमध्ये होतो अन्…”; राधिका आपटेनेच सांगितलं स्वतःच्या लग्नात नेमकं काय घडलं?
आता वेडेपणा सुरु होणार आहे म्हणत रितेशने सलमानचे आभार देखील मानले आहेत. म्हणजेच रितेशच्या मराठी चित्रपटामध्ये सलमान झळकणार आहे. रितेशने ‘वेड’ चित्रपटाच्या सेटवरील सलमानसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसंच त्याचं तोंडभरुन कौतुक देखील केलं. रितेश देशमुख दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.