बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत. फिल्म इंडस्ट्रीतही त्याला आदर्श मानणारे आणि त्याचे चाहते असणारे अनेक जण आहेत. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हादेखील शाहरुखचा चाहता आहे. अलिकडेच रितेशने एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटियाशी गप्पा मारल्या. यावेळी त्याने शाहरुखशी त्याची पहिली भेट कशी होती याबद्दल सांगितलं. तसेच किंग खानमुळे त्याला एक अशी सवय जडलीये जी त्याच्यासाठी अफेअरसारखी बनली आहे, असा खुलासा त्याने केला.
रितेश आणि तमन्नाचा हा व्हिडीओ नेटफ्लिक्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात रितेश म्हणाला, “शाहरुख खान माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आले होते, त्यांना पाहून मी खूप उत्साहित झालो होतो. कारण मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. शाहरुखला भेटल्यानंतर मी त्यांना काय घेणार (चहा, कॉफी) अशी विचारणा केली. त्यावर शाहरुखने काहीच घेणार नसल्याचं म्हटलं. मात्र मी थोडा आग्रह केल्यानंतर शाहरुखने ब्लॅक कॉफी घेणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी पहिल्यांदाच ब्लॅक कॉफी काय असते, ते मला शाहरुखमुळे कळालं,” अशी माहिती रितेशने तमन्नाशी बोलताना दिली.
तेजस्वी प्रकाशने गोव्यात खरेदी केलं आलिशान घर; ‘या’ कलाकारांचे समुद्रकिनारी असलेले बंगले पाहिलेत का?
रितेश पुढे म्हणाला, “जेव्हा शाहरुखने मला ब्लॅक कॉफी मागितली तेव्हा मी माझ्या शेफकडे गेलो आणि त्याला ब्लॅक कॉफी बनवण्यास सांगितलं, पण त्यालाही याबद्दल माहिती नव्हती. यानंतर त्याने कोणाच्या तरी मदतीने किंग खानसाठी ब्लॅक कॉफी बनवली. मला ब्लॅक कॉफीबद्दल खूप उशीरा कळलं आणि मग मी ती प्यायला सुरुवात केली. आता ब्लॅक कॉफीशी माझं नातं अफेअरसारखं झालंय.”
दरम्यान, रितेश आणि तमन्ना भाटिया पहिल्यांदाच रोमँटिक कॉमेडी चित्रपट बबली बाउन्सरमध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्श्न शशांक घोष यांनी केलंय. हा चित्रपट २३ सप्टेंबर २०२२ रोजी डिझ्नी प्लस हॉटस्टावर प्रदर्शित होणार आहे.