बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने नुकतंच आपला ३४ वा वाढदिवस साजरा केलाय. त्यानिमित्ताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे फॅन्स, फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स पोस्ट शेअर करत शुभेच्छा देताना दिसून आले. अशातच पती रितेश देशमुखने सुद्धा आपल्या खास अंदाजात जेनेलियासाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात. त्याचा हा स्पेशल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा हे बी-टाऊनमधील क्यूट कपल आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. अनेकदा या दोघांचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. नुकतंच रितेशने जेनेलिया डिसूझाला आपल्या खास अंदाजात वाढदिवसाच्या शूभेच्छा दिल्यात. रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये जेनेलियाच्या वाढदिवसाचं फॅमिली सेलिब्रेशन दिसून आलं. जेनेलिया आणि रितेशची दोन मुलं रियान आणि राहिल व त्यांच्यासोबत भाची आणि भाचे सगळे एकत्र जेनेलियासाठी हॅपी बर्थ डे गाणं गाताना दिसून आले. बच्चे कंपनीच्या या सेलिब्रेशनमध्ये रितेशसुद्धा आपल्या आवाजत ‘हॅपी बर्थ डे’ गाणं गात जेनेलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून आला. ‘परफेक्ट सेलिब्रेशन’ असं लिहून रितेशने हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ‘बर्थ डे गर्ल’ असं लिहीत रितेशने जेनेलियाला देखील टॅग केलंय.
रितेशने आणखी एक पोस्ट शेअर करताना एक आकर्षक कॅप्शन देखील लिहिलीय. मी देवावर विश्वास ठेवतो. दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुझा चेहरा पाहण्यापेक्षा आणखी दुसरं कोणतंच मोठं सुख नाही. आपल्या नात्याला २० वर्षे पूर्ण झालीत, पण असं वाटतंय ही तर कालचीच गोष्ट आहे. अद्भुत जीवनसाथी बनण्यासाठी तुझे खूप खूप आभार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको. दिवसेंदिवस तू तरूण दिसतेय. पण माझ्याबाबतीत तसं नाही बोलू शकत. काही दिवसानंतर लोक म्हणतील, जेनेलियासोबत हा अंकल कोण आहे? हॅपी बर्थ डे जेनेलिया.”
रितेशने शेअर केलेल्या परफेक्ट सेलिब्रेशनच्या व्हिडीओमध्ये तिची मुलं आणि भाचे हा क्षण एन्जॉय करताना दिसून आले. आपल्या मुलांनी गायलेलं ‘हॅपी बर्थ डे’ गाणं ऐकून जेनेलियाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता. या व्हिडीओमधील रितेश-जेनेलियाची क्यूट केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. या व्हिडीओवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे. मागच्या वर्षी देखील रितेशनं जेनेलियाला आपल्या खास अंदाजात तिच्या वाढदिवसाला अशाच प्रकारचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता.