बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यामुळेच त्याचे व्हिडीओ किंवा सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरल होताना दिसतात. नेहमीच फनी व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना हसवणाऱ्या रितेश देशमुखचा आता मात्र एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो हेअर स्टायलिस्टवर भडकलेला दिसत आहे. एवढंच नाही तर रागात तो स्वतःच्याच डोक्यावर पाणी देखील ओतून घेतो. रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. पण नेमकं काय घडलं घेऊयात जाणून…
रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि तो चाहत्यांसाठी फनी रील बनवून इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. आताही त्यानं असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. रितेशनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो मिरर समोर बसलेला आहे आणि त्याचा स्टायलिस्ट त्याची हेअर स्टाइल करताना दिसत आहे.
रितेशनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा स्टायलिस्ट हेअर स्टाइल करण्याआधी त्याच्या केसांवर पाण्याचा स्प्रे मारताना दिसत आहे. पण तो बराच वेळ पाणी स्प्रे करत राहिल्यानं वैतागलेला रितेश त्याच्या हातातून ते पाण्याची स्प्रे बॉटल घेतो आणि बॉटलमधील सगळं पाणी स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतो. हा व्हिडीओ शेअर करताना रितेशनं कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी शूटसाठी तयार होत आहे.”
नेहमीच पत्नी जिनिलियासोबत मजेदार व्हिडीओ बनवणाऱ्या रितेशचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी रितेशच्या या व्हिडीओवर धम्माल कमेंट केलं आहेत. पण यासोबतच काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. फराह खाननं रितेशच्या व्हिडीओवर कमेंट करत, या व्हिडीओमधील त्याच्या एक्सप्रेशन्सचं कौतुक केलं आहे. दुसरीकडे अमिषा पटेलनं कमेंटमध्ये ‘हाहाहा’ असं लिहिलं आहे.