बॉलीवूड जगतातील रितेश देशमुख, मधुर भांडारकर आणि कैलाश खेर या सेलिब्रिटींकडून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. या सर्वांनी ट्विटरवरून आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.
आर. आर. पाटील यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. मी त्यांच्या कुटुंबाची व्यथा आणि दु:ख समजू शकतो, अशा संदेश रितेश देशमुखने ट्विटरवर टाकला आहे. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यावेळी आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते कर्करोगावर उपचार घेत असून, सोमवारी संध्याकाळी त्यांचे मुंबईत निधन झाले. आर.आर. पाटील हे जनसामान्यांचे नेते आणि एक विनयशील व्यक्ती असल्याची आठवण रितेशने ट्विटरवर सांगितली. तर गायक कैलाश खेरने त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची प्रशंसा करताना त्यांना संगीताची खूप आवड असल्याचे सांगितले. मी गायलेली काही गाणी आणि प्रार्थना पाटील यांना खूप आवडत असल्याचे त्यांनी एकदा मला सांगितल्याचे कैलाश खेर यांनी ट्विटरवर म्हटले. चित्रपटनिर्माता मधुर भांडारकर यांनीही आर.आर.पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, असे ट्विटरवरून सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा