नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. आता या चित्रपटावर प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं प्रतिक्रिया दिली आहे. रितेशनं ‘झुंड’ चित्रपटासाठी केलेलं ट्वीट सध्या खूप चर्चेत आहे.

‘झुंड’ पाहिल्यानंतर रितेशनं त्याच्या ट्विटरवर नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट केली आहे. यासोबतच त्यानं हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच जाऊन पाहावा असा आग्रह देखील केला आहे. रितेशनं लिहिलं, ‘स्वतःवर थोडी दया करा आणि ‘झुंड’ चित्रपट कृपया चित्रपटगृहात जाऊन पाहा. नागराज मंजुळे देशातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे. तो तुम्हाला रडवतो, आनंद देतो, वेदनांचा अनुभव देतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तुम्हाला समाजातील भिंतीने विभागलेल्या दोन भारतांचा विचार करायला लावतो.’

आणखी वाचा- “मी हैराण झाले कारण…” आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’वर सावत्र बहीण पूजा भट्टची प्रतिक्रिया चर्चेत

दरम्यान अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. ‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे.

आणखी वाचा- ‘झुंड’ पाहिल्यावर आमिरला अश्रू अनावर; अमिताभ बच्चन म्हणतात “तो नेहमीच अति…”

‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत.

Story img Loader