राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ३९ आमदारांनी बंड पुकारल्याने निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामान्यानंतर भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन केले जात आहे. तर दुसरीकडे आता मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असं जाहीर केलं आहे. पण या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणातला ट्विस्ट पाहून क्षितीज पटवर्धनला आली ‘या’ चित्रपटाची आठवण
रितेशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रितेश म्हणाला, “महाराष्ट्राचे पुरोगामी, कृतीशील आणि काळजी घेणारे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी यांचे खूप खूप आभार. मानवतेने आजवरच्या सर्वात कठीण काळात करोना साथीच्या आजाराशी सामना करताना, आम्हा नागरिकांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि त्यांच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.”
आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का
३१ महिने मुख्यमंत्रीपदी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्ता स्थापन केली. गेल्या महिन्यात महाविकासआघाडी सरकारने अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. त्यावेळी आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचे आमदार फुटल्याने त्यांना २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.