बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. रितेश आणि जिनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. रितेश हा नेहमी त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. आज जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने एक हटके पोस्ट केली आहे.

आपल्या हास्यानं आणि निखळ सौंदऱ्यानं सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून जिनिलियाला ओळखले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. महाराष्ट्राची वहिनी अशी तिची खास ओळख सांगितली जाते. आज जिनिलियाचा वाढदिवस आहे. यानिमित्त अनेक कलाकार विविध पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

रितेश देशमुखने ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यावर संतापली जिनिलिया, म्हणाली “तू आता…”

नुकतंच तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखने जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्याने एक मजेशीर व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत तो समोसा आणि मुलींचे वय याबद्दल बोलताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना रितेशने जिनिलियासाठी खास पोस्ट केली आहे.

रितेश देशमुखची इन्स्टाग्राम पोस्ट

“आज मी सकाळी उठलो तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढल्याचे जाणवले आणि त्यासोबत एक हसू होतं जे मला चेहऱ्यावरुन पुसून टाकता येत नव्हते. त्यावेळी बाहेर पाऊस पडत आणि का, कोण जाणे आकाशालाही माहिती असावे की आजचा दिवस फार खास आहे. माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझी जोडीदार, माझी जीवनसाथी, माझी समीक्षक आणि माझी सर्वात मोठी चेअरलीडर जिनिलिया देशमुख हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

काही लोक प्रेमात वेडी होतात, काही वेड्यासारखी प्रेम करतात… मला तुझं वेड आहे. जिनिलिया तू माझे कायमस्वरुपी असणारे प्रेम आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशा खास शब्दात रितेशने जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखकडून तुला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट कोणतं? जिनिलिया म्हणाली…

दरम्यान ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जिनिलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. २०१२ मध्ये ते लग्नबंधनात अडकले. त्या दोघांना रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत.