आशा नेगी आणि ऋत्विक धनजानी ही जोडी ‘नच बलिये ६’ची विजेती ठरली असून, ते दोघे इतक्यात लग्न करणार नसल्याचे आशाने म्हटले आहे. सध्या ते व्यावसायिक जबाबदारीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. आम्ही एव्हढ्यात लग्नाचा विचार करत नसून, तीन-चार वर्षापर्यंत तरी आम्ही लग्न करणार नाही. आम्हाला प्रथम व्यावसायिकदृष्ट्या स्थिर व्हायचे आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्ही फक्त आमच्या करिअरचाच विचार करत असल्याचे आशा म्हणाली. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या सेटवर भेटलेल्या ऋत्विक आणि आशामध्ये अल्पावधीतच जवळीक निर्माण झाली. कामाच्या व्यापामुळे एकमेकांना भेटण्याची फार कमी संधी मिळणाऱ्या या जोडीला ‘नच बलिये’ डान्सिंग रिअॅलिटी शोमुळे एकमेकांबरोबर अधिक वेळ घालविण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यातील संबंधात अधिक घनिष्ठता निर्माण झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याविषयी बोलताना आशा म्हणाली, मला वाटते नृत्याने आम्हाला एकमेकांच्या अधिक जवळ आणले. नृत्याचा सराव करताना आम्ही आयुष्यातील काही चांगले क्षण जगलो. भविष्यात अशाप्रकारच्या अनेक रिअॅलिटी शो मध्ये भाग घेण्याचा आमचा मानस आहे.

Story img Loader