पुण्यात अगदी निवडक लोकांच्या उपस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन आणि शिवम तिवारी यांनी लग्नगाठ बांधली. १६ ऑगस्ट रोजी दोघांचा विवाहसोहळा पार पडला आणि सध्या दोघेही प्रागमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तेथील काही फोटो रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
कोणताही गाजावाजा न करता रिया आणि शिवमने लग्न केलं होतं. लग्न समारंभाला नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रिणींनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, आता या नात्याला न लपवता रिया सोशल मीडियावर बरेच फोटो पोस्ट करताना दिसतेय. प्रागच्या एका रेस्तराँमधील शिवमसोबतचे फोटो तिने इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. रिया आणि शिवम बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शिवमसोबतचे बरेच फोटो पोस्ट करण्यात आले होते. तिच्या जोडीदाराविषयी सांगायचं झालं तर, तो फोटोग्राफीच्या क्षेत्रात सक्रिय असून, विविध ठिकाणी भटकंती करण्याचीही त्याला आवड आहे.
https://www.instagram.com/p/BY5LrRwADXW/
वाचा : प्रतीक बब्बर करतोय राजकीय नेत्याच्या मुलीला डेट
पारंपरिक बंगाली पद्धतीने रिया आणि शिवमचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो रियाची बहिण रायमा सेनने सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘स्टाईल’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘झंकार बिट्स’, ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातील भूमिकांमुळे रिया चर्चेत आली होती. हिंदीसोबतच तिने बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं आहे. लवकरच ती एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमस रिटर्न्स’ या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे.