हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या नावाभोवती असणारं वलय पाहता त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सर्वांसमोर उघड होतात. त्यातही चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांच्या आयुष्यात असे काही किस्से घडून गेले आहेत ज्यांच्याबद्दल आजही बरंच बोललं जातं. असाच एक किस्सा आर जे अनमोलने त्याच्या ‘अनमोल की अनमोल कहानिया’ या कार्यक्रमातून सांगितला आहे.
जतिन खन्ना म्हणजेच अभिनेता राजेश खन्ना यांना अभिनयाची आवड फार आधीपासूनच होती. महाविद्यालयीन दिवसांपासूनच नाटक, रंगभूमी आणि अभिनयाची त्यांना फार आवड होती. त्यादरम्यानच थापा नामक एका नाटकाच्या दिग्दर्शकांनी राजेश खन्ना म्हणजेच तेव्हाचे जतिन खन्ना यांना चर्चगेटच्या गेलॉर्ड येथे भेटण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातच झाली होती. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर इथेतिथे नजर फिरवल्यावर खन्ना एका ठिकाणी बसले. त्याचवेळी एका टेबलवर त्यांची नजर पडली आणि तिथे बसलेल्या मुलीच्या सौंदर्यावर राजेश खन्ना त्यांचं भान हरपून बसले.
तितक्यातच थापा तेथे आले आणि त्यांनी त्या मुलीला थेट राजेश खन्ना यांच्या टेबलाजवळ बोलवलं. त्या मुलीचं नाव होतं अंजू महेंद्रू. पुढे हीच तुझ्या पुढच्या नाटकातील अभिनेत्री आहे, असं थापा जेव्हा राजेश खन्ना यांना म्हणाले त्यावेळी त्यांना थोडा धक्काच बसला. ही त्यांची पहिली भेट होती खरी पण, त्यानंतर व्हायचं तेच झालं. ओळख वाढली, भेटीगाठी वाढल्या आणि प्रेमही. हे दोघंही एकमेकांना जस्टिन आणि निकी म्हणून संबोधत असत.
त्यादरम्यानच फिल्मफेअर मासिकात एका मोठ्या फिल्मी स्पर्धेची जाहिरात अंजू महेंद्रू यांनी पाहिली आणि त्या स्पर्धेत जतिनला सहभागी होण्याचा सल्ला दिला. आणि त्यांनी त्यात सहभागी होत जेतेपद पटकावलं आणि चित्रपटसृष्टीला मिळाला सुपरस्टार राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या नव्या प्रवासाला वेगाने सुरुवात झाली आणि अंजूसोबतचं त्यांचं नातं तितक्याच वेगाने हरवत चाललं होतं. प्रसिद्धीच्या या माहोलात जस्टिन- निकीचं नातं कुठेतरी हरवत गेलं. त्यादरम्यानच एका दिवशी चित्रीकरणाच्या निमित्ताने जात असताना विमान प्रवासादरम्यान त्यांची डिंपल कपाडियासोबत ओळख झाली. हा चेहरा अनेकांसाठी अनोळखी होता खरा. पण, त्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यात जवळीक निर्माण होत गेली. मासिकं, वृत्तपत्र सर्वच ठिकाणी डिंपल- राजेश यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा पाहायला मिळत होत्या, ज्यामुळे अंजू फार अस्वस्थ होत्या.
(सौजन्य- आरजे अनमोल/ फेसबुक)
या सर्व प्रकरणात तेव्हा एक वेगळं वळण आलं ज्यावेळी डिंपल आणि तिच्या कुटुंबियांसाठी खंडाळ्याच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं. त्याचवेळी अंजू महेंद्रू यांनी आशिर्वाद बंगल्यावर फोन लावला आणि राजेश खन्ना यांच्याविषयी चौकशी केली. दुसऱ्याच क्षणाला अंजूने थेट आशिर्वाद बंगल्यावर येण्याचा निर्णय घेतला. तितक्यातच राजेश खन्ना यांच्या निकटवर्तीयांनी हा गोंधळ सावरुन नेण्याचे प्रयत्न सुरु केले. खंडाळ्याच्या हॉटेलवर फोन लावत राजेश खन्ना यांना सर्व प्रकारची कल्पना दिली. त्यातच अंजू महेंद्रू आशिर्वाद बंगल्याहून खंडाळ्याकडे गेल्या होत्या. यादरम्यानच तलवार यांनी राजेश खन्ना यांना सर्व परिस्थितीची माहिती दिली. पुढच्याच क्षणाला खंडाळ्याच्या त्या हॉटेलमध्ये कोणती पार्टी होती याचा लवलेशही पाहायला मिळाला नाही.
वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?
त्यानंतर काही दिवसांनी राजेश खन्ना यांना एका पार्टीमध्ये जाण्यासाठी अंजूने फार आग्रह केला. पण, त्या पार्टीला न जाण्याच्या निर्णयावर खन्ना ठाम राहिले. त्या क्षणाला अंजू महेंद्रूने आशिर्वाद बंगल्यातून आणि या सुपरस्टारच्या आयुष्यातून काढता पाय घेतला. दुसऱ्याच दिवशी अंजूने सर्व भेटवस्तू राजेश खन्नांच्या घरी पाठवून दिल्या. राजेश खन्नांच्या आयुष्यातून अंजूची एक्झिट फार आधीच झाली होती. त्यांचं नातं फक्त नावापुरताच उरलं होतं. अंजूसोबत सुपरस्टारचं नातं संपलं असलं तरीही डिंपलच्या रुपात त्यांची एक नवी इनिंग सुरु झाली होती.