या चित्रपटाच्या निमित्ताने रॉबर्ट डी निरोबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अनुपम खेर यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. त्यामुळे चित्रपटाचे विदेश दौरे आटपून अनुपम खेर भारतात परतले असले तरी या आठवणी त्यांच पिछा सोडायला तयार नाहीत. याच आठवणी लघुपटाच्या माध्यमातून चितारायच्या आणि लोकांना रॉबर्ट डी निरोची गोष्ट सांगायची या हेतूने अनुपम खेर लघुपटाची निर्मिती करत आहेत.
हा लघुपट साकारण्याची कल्पना होती ती लेखिका यामिनी क्षीरसागर हिची. अनुपम खेर चित्रिकरणासाठी फिलाडेल्फियाला जाण्याआधी रॉबर्ट डी निरो यांच्यासाठी त्यांच्याकडे भेटवस्तू द्यावी म्हणून यामिनी आणि तिची मैत्रीण रिमल अरोरा सगळीकडे हिंडल्या होत्या. त्यांच्या याच खरेदीच्या गोष्टीतून ‘आय वेन्ट शॉपिंग फॉर रॉबर्ट डी निरो’ची कथा जन्माला आली. तिने ती संकल्पना अनुपम यांना ऐकवली आणि त्यांनाही ती खूप आवडली. अनुपम यांनी स्वतचा हा लघुपट दिग्दर्शित करण्याचे ठरवले. २९ मिनिटांचा हा लघुपट यामिनी आणि रिमलवरच चित्रित करण्यात आला आहे.
‘या मुंबईनगरीत लाखो लोक स्वप्ने घेऊन येतात. मीही असाच कधीतरी इथे आलो होतो.  ‘सिल्वर लायनिंग्ज ऑफ प्लेबुक’ हा हॉलिवुडपट  साईन करत असताना एकप्रकारची हुरहूर माझ्या मनात होती. मला माझा पहिला हिंदी चित्रपट मिळाला ती आठवण त्यावेळी आली. ‘आय वेन्ट शॉपिंग फॉर रॉबर्ट डी निरो’ हा लघुपट करताना मला माझ्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण झाली. एकंदरीतच या दोन चित्रपटांशी मी भावनिकरित्या गुंतलो गेलो आहे. ‘सारांश’ ते ‘सिल्वर लायनिंग्ज ऑफ प्लेबुक’ माझ्या अभिनयप्रवासाचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना मनात जोर धरते आहे. याच भावनेतून हा लघुपट जन्माला आला आहे, अशी भावना अनुपम खेर यांनी व्यक्त केली.

Story img Loader