एरव्ही हॉलीवूडपटांची उचलेगिरी करत आमचाच बॉलीवूड चित्रपट किती छान आहे, अशी टिमकी वाजवण्यात इथली निर्माते-दिग्दर्शक मंडळी धन्यता मानायचे. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे म्हणजे आता उचलेगिरी होत नाही असे नाही पण, त्याची मोठी किंमत मोजावी लागते म्हणून मग आधीच किंमत मोजून अधिकृतरीत्या रिमेक केला जातो. हॉलीवूडवाले सध्या भारतीय प्रेक्षकांच्या मोठय़ा बाजारपेठेमुळे चांगलेच अचंबित झाले आहेत. शिवाय, भारतीय चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते आहे त्यामुळे झालं आहे काय की आपल्या निर्मात्यांना उचलेगिरी करण्यापर्यंत जावंच लागत नाही. उलट हॉलीवूडवालेच येतात विचारत, ‘आमच्या चित्रपटाचा रिमेक करता का हो..’
सलमान खानच्या ‘दबंग’गिरीनंतर एकूणच पोलीस हीरो असलेले चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रचंड कमाई करतात, असे हॉलीवूडमधील काही चाणाक्ष दिग्दर्शकांच्या लक्षात आले आहे. हॉलीवूडमध्येही पोलीस, एफबीआय हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यांच्यावरच्या चित्रपटांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे ते चित्रपटही भारतात चांगले चालतील, असा अंदाज बांधून तिथल्या मंडळींनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ब्राझीलचा दिग्दर्शक जोस पडिल्हा याचा ‘रोबोकॉप’ हा चित्रपट १४ फेब्रुवारीला भारतात प्रदर्शित होतो आहे. १९८७ सालच्या हॉलीवूडपटाचाच हा रिमेक आहे, पण या चित्रपटाचा भारतीय अवतार तयार करणार असल्याचे संकेत जोसने दिले आहेत.
जोस स्वत: बॉलीवूड चित्रपटांचा चाहता आहे. ‘रोबोकॉप’मध्ये अर्धा माणूस आणि अर्धा यंत्रमानव अशा वेगळ्या पोलिसांचे कारनामे पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा हिंदी रिमेक व्हावा, अशी खुद्द जोसची इच्छा असून त्याने त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू केले असल्याचे समजते. ‘या चित्रपटाचा भारतीय रिमेक झाला तर मला खरोखरच आनंद होईल. मला स्वत:लाच त्याची बॉलिवूड आवृत्ती कशी असेल यात रस आहे’, असे सांगणाऱ्या जोसने अर्थातच ही कल्पना प्रेक्षकांना कशी वाटेल हे माहीत नाही. असे मिश्कीलपणे सांगत बॉलीवूड रिमेकसाठी आपण तयार असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader