|| गायत्री हसबनीस
समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या नजरेत अढळ स्थान निर्माण केलेला हिंदूी-इंग्रजी चित्रपट अभिनेता जिम सारभ आपल्या आगामी ‘सोनी लिव्ह’वरील ‘रॉकेट बॉईज’ या वेबमालिकेतून ओटीटीवर दोन वर्षांच्या अंतराने एका आगळय़ा भूमिकेतून दिसणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित ही वेबमालिका असून डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक संशोधनावरील खडतर वाटचालीवर प्रकाश टाकणारी आहे. जिम सारभ याने डॉ. होमी भाभा यांची व्यक्तिरेखा साकारली असून यानिमित्ताने त्याने आपल्या भूमिकेविषयी मनमोकळया गप्पा मारल्या..
‘‘ओटीटी हे व्यासपीठ अजूनही सगळय़ांसाठी नवीन आहे हेच मला प्रामाणिकपणे वाटतंय,’’ असं स्पष्ट मत अभिनेता जिम सारभ याने व्यक्त केले. ‘‘आत्ताही ओटीटीवरील आशयनिर्माते हे पुर्णपणे मुरले आहेत असं मी म्हणणार नाही, कारण आत्तापर्यंत प्रयोग करत राहणे, या व्यासपीठावरील नवीन आयाम समजून घेणे आणि कुठल्या विषयांमध्ये जास्त सामथ्र्य आहे यांचा धुंडाळा करत राहणे यामुळे ओटीटीला अजूनही लेखक, दिग्दर्शक समजून घेतायेत हे मला वेळोवेळी जाणवले आहे,’’ असेही मत त्याने या वेळी व्यक्त केले.
सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नीरजा’ या चित्रपटातून जिम सारभ हा अभिनेता प्रेक्षक आणि समीक्षकांच्या नजरेत ‘ताकदीचा अभिनेता’ म्हणून समोर आला आणि त्याच्या वेगळय़ा अभिनयशैलीचे सगळीकडेच कौतुक झाले. ‘नीरजा’ या चित्रपटातील त्याची भूमिका साहाय्यक जरी असली तरीही आपल्या नैसर्गिक अभिनयाने त्याने ती अधिक जिवंत केली होती हे सर्वानीच पाहिले आणि आपल्या अभिनयातील हेच वैशिष्टय़ कायम राखत जिमने यानंतर अनेक भूमिका केल्या आहेत. ‘राबता’, ‘द डेथ इन कुंज’, ‘पद्मावत’, ‘हाऊस अरेस्ट’, ‘संजू’ आणि ‘द वेडिंग गेस्ट’ यांतील व्यक्तिरेखेतूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
‘मेड इन हेवन’सारख्या यशस्वी वेबमालिकेनंतर ‘रॉकेट बॉईज’ या आगामी ‘सोनी लिव्ह’वरील वेबमालिकेच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून दिसणार असून नामवंत भारतीय शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांची भूमिका त्याने केली आहे. ‘‘माझा एक स्पष्ट विचार होता ही भूमिका करताना की प्रत्यक्ष लोकांसमोर त्यांची व्यक्तिरेखा ही अधिक मानवी वाटायला हवी, म्हणजेच काय तर असं एक पात्र ज्यांची प्रतिमा ही भारतातील सन्माननीय व्यक्तींच्या यादीत आहे. ज्यांनी इतिहास घडवला आहे. ज्यांच्या दृष्टिकोनातून भविष्यात स्वप्न साकारण्याचा विचार खरा उतरतो तसेच ज्यांच्याकडे ती चिकाटी आहे अशा नामवंत व्यक्तीची भूमिका करतो आहे. ज्यांच्याविषयी जनमानसात फक्त माहिती आहे. अर्थातच माहितीपटातून, पुस्तकातून अशी मोठी व्यक्ती आपल्यापर्यंत आपल्या बुद्धिप्रामाण्याप्रमाणे पोहोचतच असते आणि डॉ. होमी भाभा यांचे कार्यही देशात आणि जगात प्रत्येकांना ज्ञात आहेच. पण चरित्रपटातून त्यांचे दर्शन एका व्यक्तिरेखेतून उमटणार असल्याने मानवी गुणधर्माचा वापर त्या व्यक्तिरेखेत करणे गरजेचे होते आणि तेच माझ्यापुढील आव्हान होते.’’ अशाप्रकारे आपल्या भूमिकेचा केलेला कसून अभ्यास आणि त्याचबरोबरीने आलेली आव्हाने यावर बोलताना जिमने आपला अनुभव सांगितला.
‘‘रुपेरी पडद्यावरून मानवी भावभावनांचा बंध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते जे मी डॉ. होमी भाभा यांच्या भूमिकेतून साकारण्याचा प्रयत्न केला आहे, कारण सरतेशेवटी ते मला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. मी आणि ‘रॉकेट बॉईज’चे लेखक अभय पन्नू, दोघांनी या व्यक्तिरेखेवर खूप काम केले आहे. डॉ. होमी भाभा यांचा अभिनय साकार व्हावा म्हणून कार्यशाळा केल्या. खूप तालमी केल्या. डॉ. भाभांच्या रूपाने, अशा दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून बाहेर पडणारे संवादही काही चारलोकांसारखे नसतील या विचाराने त्यांच्या संवादांवरही खूप काम केले आहे. मी ऑक्टोबर २०२० मध्ये ही संहिता वाचली आणि अगदी डिसेंबपर्यंत त्या संहितेवर माझे काम चालू होते. त्यानंतर पुढील वर्षी चित्रीकरण चालू झाले तेव्हा मला हे स्पष्ट झाले होते की मला भूमिकेतून काय साकार करायचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील स्वभाव वैशिष्टय़े, थोडक्यात सांगायचे तर ते सज्जन आणि बुद्धिमान होतेच पण त्यांना विनोदबुद्धी आणि कलाही अवगत होती आणि दुसरी म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ती सहजता. हे सर्व आपल्याला साकारायचे आहे हे मी ठरवले,’’ हेही त्याने सविस्तरपणे सांगितले.
आपण डॉ. होमी भाभा यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अनेक लोकांशी बोललो, भेटलो असल्याचे त्याने सांगितले. डॉ. होमी भाभा यांची भाषणे, त्यांच्याशी जोडली गेलेली माणसे, त्याच्याविषयी अधिक माहिती असलेल्यांशीही आपण बोललो असल्याचे जिमने स्पष्ट केले. डॉ. विक्रम साराभाई यांची कन्या सुप्रसिद्ध नृत्यागंना आणि अभिनेत्री मल्लिका साराभाई यांचीही मदत झाली असे त्याने सांगितले. खरंतर या कलाकृतीच्या निमित्ताने डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या मैत्रीचे आपण अधिक साक्षीदार झालो असल्याचे जिमने या वेळी व्यक्त केले. ‘‘दोघांचा मेंदू इतरांपेक्षा तल्लख होता. त्यांचे विचार हे संशोधनात्मक होते. त्यामुळे त्यांची एकमेकांशी कधी स्पर्धा नव्हती तर सहकार्य अधिक होते. त्यांच्या मैत्रीतील नि:स्वार्थी भावना आणि त्याचबरोबर समोरच्याला अधिक समृद्ध करण्याची उमेद मला अधिक भावली व मला खात्री वाटते की जी पडद्यावरही प्रेक्षकांनाही भावेल.’’ असं जिम सारभने विस्तृतपणे सांगितले.
संदेश पोहोचवण्याचे बंधन नको
‘‘चरित्रपट दाखवताना चौकटीत बसणारा आदर्श संदेश पोहोचवावा याचे बंधन नसावे असे मला वाटते. निर्मात्यांना एखाद्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय भावले हे एवढे सांगायचे नक्कीच स्वातंत्र्य आहे किंबहुना त्यांना त्या कलाकृतीतून जे काही मांडायचे आहे ते मांडण्याइतपत मोकळीक असली तरी पुरेसे आहे,’’ असे मत जिम सारभ याने मांडले.
चित्रपट, मालिका निवडीवर सर्वाचा हक्क
‘‘अभिनेते आपल्यापरीने कथा निवडतात. माझ्यासाठीही तेच लागू होते. कोणाला दिग्दर्शक आवडतो. कोणाला कथा आवडतात. कोणाला कथा सोडून भूमिका आवडते. कोणाला काहीच आवडत नाही पण तरीही व्यावसायिक चौकटीत एखादी कलाकृती करायची असते. प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडीनुसार कथा, लेखक, दिग्दर्शक, निर्माता निवडायचा हक्क आहे. मला या व्यक्तिरेखेच्या वेगवेगळय़ा वयातील विविध टप्पे साकारायला मिळाले आहेत, त्यामुळे डॉ. होमी भाभा यांच्या जीवनातील तीस वर्ष सलग कथेतून मांडण्याचा विचार मला आवडला,’’ असे जिम सारभ म्हणतो.
‘‘नायक आणि सिनेमातील हिरो या दोन माझ्यासाठी वेगळय़ा संकल्पना आहेत. रुपेरी पडद्यावर व्यावसायिक दृष्टिकोनातून ज्याप्रकारे अभिनेत्याची ‘सिक्स पॅक’ दिसावेत म्हणून आहार आणि व्यायामासाठी जी मेहनत केली जाते ती मी केली नाही. ती करायची मुळातच गरज नाही आणि ना त्यांच्यासारखेच दिसलो पहिजे या हट्टापायी म्हणून मी फार काही वेगळं केलंय आणि तेही मुळात का करायचे? रंगभूषेची कला आहे आपल्याकडे. डॉ. होमी भाभा हे नायक आहेत. त्यांची भूमिका ही माझ्या अभिनयातून लोकांना आणि मुळात त्या कथेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे तेव्हा रंगभूषा आणि वेशभूषाकारांवर मी विश्वास ठेवून शारीरिक अंगाने कुठलीही तारवरची कसरत केली नाही.’’
– जिम सारभ, अभिनेता