वयस्कर व्यक्तींच्या आयुष्यात अस्तित्त्ववादाची कोडी गहन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्याचा अंत सुखमय व्हावा, असे वाटू लागते. ‘आता वेळ झाली’ या मराठी चित्रपटाची कथा अशाच एका सत्य घटनेवर आधारित असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सध्याच्या स्थितीत मानवी मूल्ये जपणाऱ्या कोणाच्याही मनात द्विधा परिस्थिती निर्माण करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने केले असून सोबतीला भक्कम अशी कलाकारांची फळी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘मला नेहमीच अस्सल चित्रपट बनवायचा होता. असा चित्रपट की जो सामाजिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असेल आणि वास्तववादी असेल. ‘आता वेळ झाली’चा विषय मला प्रत्येक पिढीला खिळवून ठेवेल तसेच आयुष्याबद्दल व अस्तित्वाबद्दल पुनर्विचार करायला लावेल असा वाटला’’ असे उद्गार निर्माते दिनेश बन्सल यांनी काढले. दिनेश बन्सल (इमॅजीन एंटरटेन्मेट अँड मिडिया प्रायव्हेट लिमिटेड), अनंत महादेवन (अनंत महादेवन फिल्म्स), जी के अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोलकर या दमदार कलाकारांबरोबरच सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयवंत वाडकर, अभिनव पाटेकर हे इतर कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

‘‘कोविड साथरोगाच्या काळात सक्रिय इच्छामरण हा विषय माझ्या मनात रुंजी घालत होता. त्यावेळी संपूर्ण जग आयुष्य आणि मृत्यू याकडे संपूर्णत: वेगळय़ा नजरेने पाहत होते. अगदी युवकही आयुष्याकडे भौतिकवादी दृष्टीने पाहण्याऐवजी व्यावहारिक दृष्टीने पाहू लागले होते. हाच धागा घेऊन आयुष्याच्या अंतापर्यंत हसत जगलं पाहिजे हा विचार मांडणारा चित्रपट पाहून वयस्कर प्रेक्षकच नव्हे तर युवा प्रेक्षकही नि:शब्द झाले’’ असा अनुभव महोत्सवात चित्रपटच दाखवल्यानंतर आल्याचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी सांगितले. प्रदीप खानविलकर यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून कुश त्रिपाठी, अनंत नारायण महादेवन यांनी त्याचे संकलन केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohini hattangadi dilip prabhalkar marathi movies directed by anant mahadevan national award amy