चित्रपटातून पोलिस आणि गुंडांमधील चकमकी साकारणे ही अभिनेता रोहित रॉयसाठी काही नविन गोष्ट नाही. आजवर त्याने कित्येक चित्रपटांतून चकमकींमध्ये भाग घेतला आहे पण एक गुंड म्हणून. ‘एन्काऊंटर’ या सोनीवरच्या नव्या शोच्या निमित्ताने रोहित पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रात्री-अपरात्री लुटमारी करण्यासाठी पहिल्यांदाच कट्टयाचा वापर करणारी गुंडांची टोळी ‘कट्टा गँग’ म्हणूनच ओळखली जात होती. मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या या  ‘कट्टा गॅंग’चा खातमा करणाऱ्या मिलिंद मंडलिक या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका रोहितने केली आहे.
रात्री-अपरात्री महामार्गावर हल्ला करून दरोडे टाकणारी ही टोळी लोकांची निर्घृण हत्या करण्यासाठी प्रसिध्द होती. ही कट्टा गँग संपवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये त्यांचा म्होरक्या कट्टा श्रीधर मारला गेला. आणि या गँगच्या अत्याचारातून मुंबईकरांची सुटका झाली.
 ‘एन्काऊंटर’च्या या ‘कट्टा श्रीधर गँग’ भागात अभिनेता मुरली शर्मा याने श्रीधरची भूमिका केली आहे. पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारायला मिळाल्याबद्दल आनंद झाला असल्याचे रोहितने म्हटले आहे. ‘एन्काऊंटर’ हा शो टीव्हीवरच्या इतर शोपेक्षा वेगळा असल्याने त्यात काम करतानाचे समाधान वेगळे आहे.
त्याचबरोबर अभिनेता मुरली शर्माबरोबरही तब्बल पंधरा वर्षांनी एकत्र काम केले असून प्रेक्षकांना आम्हाला एकत्र पहायला नक्की आवडेल, असा विश्वास रोहितने व्यक्त केला.
मुरली शर्मानेही रोहितबरोबर आपली चांगली मैत्री आहे. पण, आम्हा दोघांनाही इतक्या वर्षांनी एकत्र काम करायला मिळाले, असे सांगतानाच कट्टा श्रीधरची भूमिका आपल्यासाठी आव्हानात्मक होती. श्रीधर हा अतिशय कुख्यात आणि निर्दयी होता. त्यामुळे याआधी मी कितीतरी खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी कोणतीही दयामाया न दाखवत केवळ पैशासाठी लोकांची हत्या करणाऱ्या श्रीधरची भूमिका साकारणे अवघड होते, असे मुरली शर्मा याने सांगितले.