दिग्दर्शक रोहित शेट्टीला शनिवारी गोव्यामध्ये ‘दिलवाले’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पणजी येथे चित्रीकरणावेळी या ठिकाणच्या रस्त्यावर अवैधरित्या लावण्यात आलेले बॅरिकेडस संतप्त प्रवाशांनी पाडून टाकले. शनिवारी दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे या चित्रीकरणासाठी कोणतीही परवानगी न घेता गोव्याच्या राजधानीतील मुख्य रहदारीचा मार्ग बॅरिकेडस लावून रोखण्यात आला होता. त्यामुळे मांडोवी नदीच्या काठावर असणाऱ्या डी.बी. रोडवर वाहनांची गर्दी जमली होती. अखेर प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी या ठिकाणी लावलेले बॅरिकेडस पाडून टाकले. यावेळी रोहित शेट्टी आणि अभिनेता वरूण धवन घटनास्थळावर उपस्थित होते.
यासंदर्भात गोव्यातील राज्य सरकार पुरस्कृत मनोरंजन संस्थेच्या रमण सातर्डेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी, ‘दिलवाले’च्या चित्रीकरणासाठी रस्ता बंद करण्याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. गोव्यात चित्रीकरण करण्यासाठी या संस्थेची परवानगी लागते. मात्र, अशी कोणतीही परवानगी संस्थेकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे ते अशाप्रकारे रस्ता अडवू शकत नसल्याचे सावर्डेकर यांनी सांगितले. दिलवाले या चित्रपटात शाहरूख खान आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा