देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगात सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच अनेक बॉलिवूज सेलिब्रिटीही या लसीकरणाचा लाभ घेताना दिसत आहेत. बॉलिवूडचा प्रख्यात दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही नुकतीच करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्याने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
रोहित शेट्टीने नानावटी हॉस्पिटलमध्ये करोना प्रतिबंधक लस घेतली. ही लस घेतल्यानंतर त्याने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये रोहित म्हणतो, “ऍक्शन आणि स्टंट्स फक्त चित्रपटांमध्ये असतात. खऱ्या आयुष्यात खतरोंके खिलाडी व्हायचा प्रयत्न करू नका. लस टोचून घ्या.”
View this post on Instagram
रोहित लिहितो, “करोनाविरुद्ध लढण्यासाठी हे एकमेव हत्यार आहे. मी आज लस टोचून घेतली. नानावटी हॉस्पिटलच्या स्टाफचे आभार, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली.”
भारतात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना करोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
धर्मेंद्र, शर्मिला टागोर, सैफ अली खान, संजय दत्त, सतिश शाह, कमल हसन अशा अनेक कलाकारांनी नुकतीच करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. आतात दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही आपला नंबर लावला आहे.
रोहितचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेता अक्षय कुमार एटीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. करोनाच्या महामारीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलण्यात आलं आहे.