सर्कस पाहायला जाताना आपल्या मनात मनोरंजन हा एकमेव उद्देश असतो. सर्कशीतील काही कलाकार कसरती करतात, काही हसवतात, काही नकला करतात, काही धाडसाचा खेळ करून दाखवतात आणि आपापल्या वाटय़ाचा हंशा घेऊन वा कौतुक घेऊन मोकळे होतात. इथे आपल्या चित्रपटातील अशा हुकमी विविधढंगी व्यक्तिरेखा आणि भविष्यात याआधीच्या लोकप्रिय व्यक्तिरेखांना मानून पुढच्या कसरती करू शकतील अशा नवीन व्यक्तिरेखांची जंत्री एकत्र आणून मनोरंजनाची सर्कस रंगवण्याचं काम दिग्दर्शक रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’ चित्रपटात केलं आहे. तर्क खुंटीला टांगून रोहित शेट्टीने रचलेल्या पोलिसी कथा विश्वातल्या नमुनेदार व्यक्तिरेखांचा एकत्रित खेळ हा निव्वळ मनोरंजन या माफक उद्देशानेच केलेला आहे, त्यामुळे किमान या चित्रपटात चांगली कथा, अमुक एक भारी दृश्य वगैरे अपेक्षांची शोधाशोध तरी व्यर्थ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीने तयार केलेल्या पोलिसांच्या कथांवर आधारित चित्रपट श्रृंखलेचा मूळ नायक हा बाजीराव सिंघम आहे. सिंघम कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे, न्यायासाठी नियमांची मोडतोड करून का होईना गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे हा त्याचा खाक्याच प्रेक्षकांना पसंत पडला. त्यामुळे ‘सिंघम’ चित्रपटातील ही बाजीरावची व्यक्तिरेखा चांगलीच लोकप्रिय झाली. ‘सिंघम अगेन’ हा बाजीरावच्या कथेवर आधारित तिसरा चित्रपट.. मात्र इथपर्यंत येईयेईतो आता केवळ सिंघमच्या नावावर नवा नवा खलनायक शोधून त्याच्या निग्रहाची कथा दाखवणं पुरेसं रंजक ठरणार नाही हे रोहित शेट्टीच्याही लक्षात आलं असावं बहुधा. त्यामुळे ‘सिंघम अगेन’मध्ये बाजीराव सिंघमवर ‘शिवा स्क्वॉड’नामक नव्या यंत्रणेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. स्क्वॉडही त्याचंच.. त्यातले अधिकारी निवडण्याचं स्वातंत्र्यही पूर्णपणे त्याचं आणि या स्क्वॉडचं काम कसं चालणार याचे नियमही त्याचेच.. असं सबकुछ सिंघमच्या हातात गृहमंत्र्यांनी देऊन टाकलं आहे. त्यामुळे कुठलातरी एक जुना दहशतवादी डोकं वर काढतो, तो दहशतवादी श्रीलंकेतून देशभर अमली पदार्थाचं रॅकेट चालवून भारताच्या तरुण पिढीचं भवितव्य अंधारमय करून टाकतो आहे. तो मुळात पाकिस्तानी दहशतवादी आहे, त्याचं अमली पदार्थाचं रॅकेट आहे आणि सिंघमला थेट भिडावं यासाठी वैयक्तिक सुडाचं एक कारणही त्याच्याकडे आहे. तर असा कोणतातरी शैतानी डोकं असलेला, खुनशी स्वभावाचा डेंजर लंका या नावाने ओळखला जाणारा शत्रू अशी परिस्थिती निर्माण करतो की सिंघमला त्याच्या नव्याकोऱ्या शिवा स्क्वॉडसह, त्याचे दोन जुने साथीदार सिम्बा आणि सूर्यवंशी यांना एकत्र आणत त्याच्याशी लढावं लागतं. या लढय़ात कोण जिंकतं हे सांगण्याची गरजच नाही, प्रेक्षकही आता शेट्टी अ‍ॅक्शनपट पाहून पुरते सुजाण झाले आहेत.

हेही वाचा >>>ऐश्वर्या रायने नाकारलेला ब्रॅड पिटबरोबरचा हॉलीवूड चित्रपट, अभिनेता म्हणालेला, “पाश्चिमात्य देशांमध्ये…”

 ‘सिंघम अगेन’ची सर्वसाधारण कथा पाहिली तर ती इतर पोलीस कथांपेक्षा फार काही वेगळी आहे असं नाही. कधी कोणी खलवृत्तीचा राजकारणी, कधी भ्रष्टाचारी यंत्रणा तर कधी सणकी डोक्याचा खलपुरुष आणि त्या त्या वेळच्या टोकाच्या परिस्थितीत शत्रूशी दोन हात करून लढणारा नायक हाच कथेचा प्रवाह इथेही आहे. या अतिपरिचित कथेला किमान वेगळा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न इथे मराठमोळा लेखक क्षितिज पटवर्धन याने केला आहे. त्यामुळे मूळ कथा आणि त्यात रंगत आणण्यासाठी समांतर सुरू असलेली रामायणाची कथा असा काहीसा वेगळा प्रयत्न ‘सिंघम अगेन’मध्ये करण्यात आला आहे. सिंघमला मर्यादापुरुषोत्तम रामाच्या चौकटीत फिट बसवलं की अर्थात सीतेच्या भूमिकेत त्याची पत्नी अवनी, रावण असलेला डेंजर लंका आणि मग रामायणातील लंकेश्वराच्या दमनापर्यंतचे महत्त्वाचे टप्पे लक्षात घेऊन चित्रपटात शिरणारे लक्ष्मण, जटायू, हनुमान, गरुड.. यांच्या प्रवेशकथा आणि अ‍ॅक्शनदृश्यांच्या दरम्यान ‘सिंघम अगेन’चा खेळ खेळवण्यात आला आहे. सिंघमच्या नव्या स्क्वॉडमध्ये दया, सिम्बा आणि सूर्यवंशी यांच्याव्यतिरिक्त सत्या आणि ‘लेडी सिंघम’ शक्ती शेट्टीचा प्रवेश झाला आहे हे ट्रेलरमधूनच जाहीर केलेलं होतं. या सगळय़ा व्यक्तिरेखा आणि त्यांच्या एकत्रित येण्यातून साधली जाणारी जुगलबंदी हा या चित्रपटातील सगळय़ात आकर्षणाचा भाग आहे. त्यावरच खेळ जिंकायचा हे पुरेसं लक्षात ठेवून चित्रपटाची मांडणी केली असल्याने काही व्यक्तिरेखा विनाकारण ‘बढाचढाके’ रंगवण्यात आल्या आहेत हे सहज लक्षात येतं. इथे दाक्षिणात्य चित्रपट शैलीचा पुरेपूर वापर केला आहे, त्यामुळे गाडय़ा नुसत्याच उडत नाहीत, तर पार हेलिकॉप्टरच्याही डोक्यावरून उडतात. नुसत्या बोटानेही गोळी लागून शत्रू मरतो आहे.. असं काय आणि काय.. पूर्वार्ध रामायणाच्या कथेचा संदर्भ घेत नायक आणि खलनायक दोघांनाही एका परिस्थितीत अडकवण्याच्या चक्रव्यूहात रेंगाळला आहे. इथे नव्या व्यक्तिरेखा येतात. पुरेसा कथाभाग स्थिरावल्यानंतर उत्तरार्धात कथा प्रचंड वेगात उडायला लागते. तोवर या शेट्टी कॉप युनिव्हर्समधले अन्य दोन हुकमी एक्केही सिंघमच्या संघर्षांत उतरल्याने खरी मजा येते.

‘सिंघम अगेन’मधील या सगळय़ा व्यक्तिरेखांच्या गोंधळात संग्राम भालेराव अर्थात रणवीर सिंगने साकारलेल्या सिम्बाने एकदम पक्का सूर पकडला आहे. त्यानेच खरी गंमत आणली आहे. त्याच्यानंतर उरलीसुरली कसर अक्षय कुमारने त्याच्या वाटय़ाला आलेल्या काही सेकंदांच्या दृश्यांतून भरून काढली आहे. दीपिका पदुकोणची शक्ती शेट्टी कधी मीनम्मा तर कधी एकदम ‘पठान’स्टाइल अ‍ॅक्शनदृश्यं देणारी नायिका या द्वंद्वात पुरती फसली आहे. टायगर श्रॉफचा सत्या अ‍ॅक्शनदृश्यात पुरेपूर खरा उतरला आहे. दीपिकापेक्षाही या चित्रपटात कधी नव्हे ते करिना कपूरची अवनी वेगळी ठरली आहे.

हेही वाचा >>>‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी

करिना अतिनाटय़मय अभिनय करण्यात अग्रेसर आहे, इथे मात्र तिने संयतपणे अवनीची भूमिका केली आहे. अजय देवगणचा सिंघम पहिल्या चित्रपटापासून आहे तसाच आहे. अर्जुन कपूरनेही कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता खलनायकाची भूमिका साकारली आहे, मात्र त्याच्या व्यक्तिरेखेला विनाकारण तर्काच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केल्याने पटकथेतच त्याचा प्रभाव कमी झाला आहे. आणि ज्या आणखी एका पोलिसाच्या स्वागतासाठी प्रेक्षक आसुसलेले असतात त्याचाही संवाद सरतेशेवटी ऐकवत नव्या स्क्वॉडच्या नव्या खेळाचे सूतोवाच रोहित शेट्टीने केले आहे. त्यामुळे मनोरंजनाची सर्कस पुढे अजून रंगतदार होणार ही आशा का होईना प्रेक्षकाला निराश करत नाही.

सिंघम अगेन

दिग्दर्शक – रोहित शेट्टी

कलाकार – अजय देवगण, अर्जुन कपूर, करिना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, श्वेता तिवारी, रवी किशन.