बॉलिवूडमध्ये आजवर बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या कलेचा नमुना सादर केला. त्यापैकी काही कलाकारांना प्रेक्षकांची दाद मिळाली. पण, काही कलाकारांना मात्र प्रेक्षकांचं प्रेम मिळालं नाही. अशा कलाकारांनी चित्रपटसृष्टीत मिळालेल्या अपयशानंतर थेट टेलिव्हिजन विश्वाची वाट धरत प्रेक्षकांची मनं जिंकली. या कलाकारांमध्ये अभिनेता नकुल मेहता, अपूर्व अग्निहोत्री, इकबाल खान, रोनित रॉय या अभिनेत्यांचा समावेश आहे. या अभिनेत्यांच्या टेलिव्हिजन कारकिर्दीवर असा अचानक प्रकाश टाकण्याचं कारण म्हणजे झाएद खानचं टेलिव्हिजन विश्वातील पदार्पण. बॉलिवूडमध्ये अपयशी ठरलेला हा अभिनेता आता टिव्ही विश्वाकडे वळला आहे. चला तर मग, बॉलिवूडमध्ये अपयशी पण, टेलिव्हिजन विश्वात प्रचंड यशस्वी ठरलेल्या या अभिनेत्यांवर एक नजर टाकूया.
नकुल मेहता- ‘हाल ए दिल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या नकुलने खरं नाव कमवलं ते म्हणजे ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेतून. सध्याच्या घडीला तो ‘दिल बोले ऑबेरॉय’ आणि ‘इश्कबाज’ या मालिकांतून झळकत असून, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश झाला आहे.
वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती
अपूर्व अग्निहोत्री- शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘परदेस’ या चित्रपटातून अपूर्वने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. ‘परदेस’नंतरही त्याचे ‘प्यार कोई खेल नही’, ‘क्रोध’, ‘हम हो गये आपके’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पण, तेसुद्धा त्याला प्रसिद्धी देऊ शकले नाहीत. त्यानंतर अपूर्वने टेलिव्हिजन विश्वाकडे त्याचा मोर्चा वळवला आणि ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली.
इकबाल खान- ‘कुछ दिल ने कहा’, ‘फंटूश’, ‘बुलेट- एक धमाका’ या चित्रपटांतून इकबाल प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण, त्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे ‘कैसा ये प्यार है’ या मालिकेतून. त्यानंतरच्या काळातही विविध मालिकांतून इकबालने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.
आयुब खान- अभिनेता नासिर खान यांचा मुलगा, अभिनेते दिलीप कुमार यांचा भाचा अशी ओळख घेऊन सुरुवातीला आयुब खानने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आतापर्यंत आयुबने २० चित्रपटांमध्ये काम केलं. पण, चित्रपटांतून या अभिनेत्याला फारसं यश मिळालं नाही. या अपयशाने खचून न जाता त्याने टेलिव्हिजन विश्वातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळवलं.
रोनित रॉय- बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या रोनित रॉयला चित्रपट विश्वातील अपयशी अभिनेता म्हणता येणार नाही. पण, इतर कलाकारांप्रमाणे त्याला फारसं यशही मिळालं नाही. ‘जान तेरे नाम’, ‘१५ ऑगस्ट’, ‘बॉम्ब ब्लास्ट’ या चित्रपटातील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. या चित्रपटांतील रोनितच्या भूमिका गाजल्या असल्या तरीही चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फार काळ तग धरु शकले नाहीत. त्यामुळे रोनितने चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच मालिकांमध्येही विविध भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं. ‘कसोटी जिंदगी की’, ‘क्यों की सास भी कभी बहू थी’, ‘बंदिनी’ या मालिकांमधून त्याने अनेकांचीच दाद मिळवली.