अभिनेता रोनित रॉयने फिल्म इंडस्ट्रीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्याच्या कारकिर्दीत त्याने खूप चढ-उतारही पाहिले आहे. त्याचा पहिला चित्रपट सुपरहिट होता, नंतर त्याचे अनेक चित्रपट फ्लॉपही झाले. अनेक अपयशांचा अनुभव घेत रॉनितने फक्त चित्रपटच नव्हे तर छोट्या पडद्यांवरील काही लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं. त्याने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये ऋषभ बजाजची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय मिळवली होती.

बॉलीवूड बबलशी बोलताना रॉनित रॉय म्हणाला, “इंडस्ट्रीकडून हळूहळू स्वीकार होत आहे. मला प्रेक्षकांकडून कौतुक व प्रेम मिळालं आणि ते गेम चेंजर ठरलं. मी दिवसाला १५०० रुपयांपासून सुरुवात केली. मला महिन्याला १ लाख रुपयांचा पहिला धनादेश मिळायला थोडा वेळ लागला. मी कायम ८३ ते ८९ हजार रुपयांवर अडकायचो. खरं तर तो फक्त धनादेश नव्हता तर माझं आयुष्य होतं. आज मी जे आहे त्याचं संपूर्ण श्रेय कसौटी जिंदगी की, एकता कपूर आणि बालाजी फिल्म्सला जातं. त्या मालिकेत माझी भूमिका सुरुवातीला ३ महिन्यांची होती, पण मला पहिल्याच आठवड्यानंतर बोलावण्यात आलं. त्यामुळे मी सुरुवातीला घाबरलो होतो कारण मला वाटलं की मला त्यांनी मालिकेतून काढून टाकलं की काय. पण त्याउलट माझ्याशी निर्मात्यांनी वर्षभराचा करार केला आणि नंतर तो वाढत गेला व मी तब्बल ९ वर्ष या शोमध्ये राहिलो.”

गंमत म्हणजे, टेलिव्हिजनमध्ये येण्यापूर्वीच रॉनित चित्रपटांमध्ये काम करायचा. तब्बल २५ आठवडे चाललेल्या त्याच्या पहिल्या चित्रपटानंतर त्याला बराच काळ चित्रपटांच्या ऑफर का मिळाल्या नाहीत, यामागची कारणं अजून कळू शकली नाहीत, असं रॉनित सांगतो. “चित्रपटगृहात तब्बल २५ आठवडे चाललेला हा चित्रपट आजच्या काळात रिलीज झाला असता तर त्याने १५०-२०० कोटी सहज कमावले असते. पण तुम्ही १०० कोटींच्या चित्रपटातून पदार्पण करत असाल आणि तरीही तुम्हाला काम मिळाले नसेल तर… या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाही,” असं रॉनित सांगतो.

Story img Loader