बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांमध्ये अभिनेता रणवीर सिंग याचं नावंही आघाडीवर आहे. तो लवकरच एका मोठ्या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. रणवीरची ही भूमिका त्याच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळी असणार हे मात्र निश्चित!
रणवीर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट सध्या करताना दिसत आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्या पुढच्या चित्रपटात रणवीर दिसणार आहे. हा चित्रपट सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट ‘अन्नियन’ याचा हिंदी रिमेक असणार आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. मूळ तमिळ चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता विक्रमने प्रमुख भूमिका साकारली होती.
Proudly announcing my collaboration with the pioneering visionary of Indian cinema, the maverick master craftsman SHANKAR @shankarshanmugh powered by veteran film producer Dr. Jayantilal Gada @jayantilalgada @PenMovies pic.twitter.com/cI2Thzxu55
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 14, 2021
रणवीरने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तो म्हणतो, “मला ही घोषणा करताना अभिमान वाटत आहे की मी भारतीय सिनेमाच्या एका दूरदर्शी कलाकार शंकरसोबत काम कऱणार आहे. ह्या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते जयंतीलाल गडा करणार आहेत. ”
हा मूळ चित्रपट ‘अपरिचित’ या नावाने हिंदीत डब करण्यात आला होता. याला भारताच्या सर्वच प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तो माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. रणवीरने रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण केलं आहे. हा चित्रपट संदीव कुमारच्या अंगूर या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक असणार आहे.