कलाविश्वातील सर्वाधिक मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९५व्या अकादमी अवॉर्डची घोषणा १३ मार्च रोजी करण्यात आली. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास ठरला. ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. याबरोबरच बहुचर्चित एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यालाही ऑस्कर मिळाला.
नाटू नाटूला ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदाच भारताला एका गाण्याने ऑस्कर मिळवून दिला आहे. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांपासून मोठमोठे सेलिब्रिटीजही याचं कौतुक करत आहेत. दाक्षिणात्य अभिनेता राम चरणही यामुळे चांगलाच चर्चेत आहे. ऑस्कर जिंकून परतल्यावर नुकतंच त्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेतली.
आणखी वाचा : ऑस्कर जिंकल्यानंतर राम चरणने घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट; वडील चिरंजीवींनीही लावली हजेरी
यापाठोपाठ राम चरणने ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात राम चरणला त्याला भविष्यात कोणती भूमिका साकारायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. थोडावेळ विचार करून राम चरण उत्तरला, “एखाद्या खेळाशी निगडीत कोणतीही भूमिका मला साकारायला आवडेल. एखादी स्पोर्ट्स फिल्म करायला मला आवडेल.” राम चरणच्या या उत्तरावर एका व्यक्तीने विराट कोहलीच्या बायोपिकचा पर्याय सुचवला. त्याबद्दल बोलताना राम चरण म्हणाला, “विराट हे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे. मला ही संधी मिळाली तर मला ही भूमिका साकारायला नक्की आवडेल, तसाही मी बराचसा विराटसारखा दिसतो.”
विराट कोहलीचासुद्धा वानखेडे स्टेडियमवरील ‘नाटू नाटू’ गाण्याची स्टेप करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे राम चरणला या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. सध्या राम चरण त्याच्या ‘आरसी १५’ या चित्रपटावर काम करत आहे. अजून याचं नाव ठरलेलं नाही. हा एक पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. तसेच यात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.