राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने काही दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता या गाण्याला ऑस्करमध्येही नामांकन मिळालं आहे. गोल्डन ग्लोब व क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकणारं हे गाणं यंदा भारताला ऑस्कर मिळवून देईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. या चित्रपटाचे चाहते आणि एकूणच भारतीय प्रेक्षकवर्ग यासाठी चांगलाच उत्सुक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीडिया रीपोर्टनुसार १२ मार्च २०२३ रोजी ऑस्कर सोहळा संपन्न होणार आहे. याबरोबरच हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका रिहाना, लेडी गागा यांनादेखील नामांकन मिळालेलं आहे. या ऑस्कर सोहळ्यात रिहाना तिच्या ‘ब्लॅक पॅंथर’ चित्रपटातील गाणं सादर करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. याबरोबरच ‘आरआरआर’ चित्रपटाची टीमसुद्धा या सोहळ्याला उपस्थित असणार आहे आणि राम चरण ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स सादर करणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा : अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ ठरला फ्लॉप; कंगना रणौतने धरलं करण जोहरला जबाबदार, म्हणाली…

सिनेफील या ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संवाद साधताना दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणने यावर भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी कौतुक होईल त्या सगळ्या ठिकाणी आम्हाला ‘नाटू नाटू’ गाण्यावर नाचायला आवडेल, पण सगळ्याच ठिकाणी ते शक्य होणार नाही, पण जर आम्ही ऑस्कर सोहळ्याला उपस्थित असू आणि तिथे लोकांनी विनंती केली आणि तेवढा वेळ असेल तर आम्हाला नक्कीच त्या गाण्यावर परफॉर्म करायला आवडेल. संपूर्ण गाणं सादर करता येणं थोडं कठीण आहे पण त्यातील मुख्य हुक स्टेप सादर करायला आम्हाला नक्कीच आवडेल.”

‘आरआरआर’ या चित्रपटात ‘नाटू नाटू’ या गाण्यावर राम चरणसह ज्युनिअर एनटीआरदेखील कमाल नाचताना आपल्याला पाहायला मिळतो. या गाण्याला मिळालेले पुरस्कार आणि एकूणच या चित्रपटाला ज्यापद्धतीने बाहेरील देशात डोक्यावर घेतलं जात आहे ते पाहता या गाण्याला ऑस्कर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील महिन्यातील ऑस्कर सोहळ्याला ‘आरआरआर’ची संपूर्ण टीम हजेरी लावेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rrr actor ram charan says he would be happy to dance on naatu naatu at oscars event avn
Show comments