दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे एस एस राजामौली होय. गेल्या वर्षभरापासून ते त्यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या अप्रतिम क्रिएटीव्हीटीने सुपरहिट पॅन इंडिया चित्रपट बनवणारे राजामौली यांना अनेकदा टीकेला सामोरंही जावं लागतं. ‘आरआरआर’च्या कथेच्या राजकीय अजेंड्यावर टीका झाली. अनेकांनी एसएस राजामौलींवर भाजपाच्या अजेंड्याला पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आता राजामौली यांनी मौन सोडलं आहे.
‘द न्यूयॉर्कर’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सर्व आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’च्या कथांमागील कल्पना स्पष्ट करत राजामौली म्हणाले, “सर्वांना माहित आहे की ‘बाहुबली’ चित्रपट काल्पनिक आहेत. त्यामध्ये भाजपाच्या सध्याच्या अजेंड्याला अनुरूप ऐतिहासिक व्यक्तिरेखा दाखवणं हा इतिहासाचा विपर्यास आहे की नाही, याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही. ‘आरआरआर’ ही एक डॉक्युमेंटरी नाही. हा ऐतिहासिक धडा नाही. यात पात्रांवर तयार केलेल्या काल्पनिक भूमिका आहेत, ज्या यापूर्वी अनेकदा बनवण्यात आल्या आहेत. जर ‘आरआरआर’ इतिहासाचे विकृतीकरण करत असेल तर, मायाबाजार हे ऐतिहासिक महाकाव्याचे विकृतीकरण आहे.”
राजामौली पुढे म्हणाले, “जे लोक माझ्यावर भाजपा किंवा भाजपाच्या अजेंडाचे समर्थन करत असल्याचा आरोप करतात त्यांच्यासाठी मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, जेव्हा आम्ही भीमची सुरुवातीची व्यक्तिरेखा तयार केली तेव्हा मी त्याला मुस्लीम दाखवलं होतं. त्यानंतर भाजपाच्या एका नेत्याने ‘आरआरआर’ चित्रपट दाखवणारी थिएटर्स जाळून टाकण्याची धमकी दिली आणि टोपी काढली नाही तर तो मला भर रस्त्यात मारेल असंही म्हणाला होता. त्यावरून तरी लोक स्वत:च ठरवू शकतील की मी भाजपाचा माणूस आहे की नाही,” अशा स्पष्ट शब्दांत राजामौलींनी प्रतिक्रिया दिली.
“मला अतिरेक करणाऱ्यांचा तिरस्कार आहे, मग तो भाजपा असो, मुस्लीम लीग असो किंवा इतर कोणीही असो. मी समाजातील कोणत्याही घटकातील अतिरेकी लोकांचा तिरस्कार करतो. हेच सर्वात सोपे स्पष्टीकरण मी माझ्यावरील आरोपांवर देऊ शकतो,” असं राजामौली म्हणाले.