राजामौली दिग्दर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ची सध्या जागतिक स्तरावर चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजनल साँगचा अवॉर्ड जिंकला. त्यानंतर आता चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ‘आरआरआर’ने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला.
क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यात आली आहे. याबरोबरच जगभरातील दिग्गज कलाकार मंडळीसुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात पडली आहेत. आता या चित्रपटाच्या ऑस्करची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. खुद्द राजामौलीसुद्धा या चित्रपटाच्या ऑस्करवारीसाठी सज्ज आहेत आणि प्रचंड उत्सुक आहेत.
आणखी वाचा : अभिनेत्री कुब्रा सैतने सांगितला सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली “पाच तास उशिरा येऊनही…”
नुकतंच त्यांनी हॉलिवूडच्या एका पत्रकाराशी संवाद साधला. यादरम्यान ते म्हणाले, “मी चित्रपट केवळ पैसे, व्यावसायिक यश आणि माझ्या प्रेक्षकांसाठी बनवतो. आरआरआर हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. त्या चित्रपटाला मिळालेलं यश माझ्यासाठी सर्वकाही आहे, पुरस्कार, मान सन्मान या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. ते सगळे पुरस्कार माझ्या संपूर्ण टीमसाठी आहेत ज्यांनी चित्रपटासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे.”
एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाने संपूर्ण जगावर गारुड केलं आहे. जपानमध्ये तर या चित्रपटाने रजनीकांत यांच्या चित्रपटाचा रेकॉर्डही मोडीत काढला आहे. जागतिक पातळीवर या चित्रपटाने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाच्या ऑस्करवारीसाठी सगळेच प्रार्थना करत आहेत.