यंदा हिंदी चित्रपटसृष्टीवर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने चांगलीच कुरघोडी केली. ‘केजीएफ २’, ‘पीएस १’, ‘आरआरआर’. ‘कांतारा’सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. पण यंदाच्या ऑस्करवारीमध्ये ‘आरआरआर’सारख्या चित्रपटाला वगळल्याने बरीच लोक निराश झाले. पहिले ‘आरआरआर’ किंवा ‘द काश्मीर फाइल्स’ या दोन चित्रपटांना ऑस्करला पाठवणार अशी चर्चा होती. पण ‘छेलो शो’ या गुजराती चित्रपटाची वर्णी लागली.
आता मात्र ‘आरआरआर’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ने २०२३ च्या ऑस्करमध्ये स्वतःचं स्थान अबाधित राखलं आहे. उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत नव्हे उत्कृष्ट गाण्यांच्या यादीत ‘आरआरआर’च्या ‘नातु नातु’ या गाण्याची वर्णी लागली आहे. या गाण्याला शॉर्टलिस्ट करण्यात आलं असून यासाठी चित्रपटनिर्माते आणि प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.
‘आरआरआर’मधील हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. यावर कित्येक मीम्स प्रचंड व्हायरल झाली होती. ज्युनीअर एनटीआर आणि राम चरण या दोघांना या गाण्यावर थिरकताना पाहून प्रेक्षक अक्षरशः तल्लीन झाले होते. आता याच गाण्याने ऑस्करच्या यादीत स्थान पटकावल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
तब्बल ८१ गाण्यांपैकी १५ गाण्यांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी एक गाणं ‘नातु नातु’ आहे. या यादीत ‘अवतार- द वे ऑफ वॉटर’. ‘ब्लॅक पॅंथर – वाकांडा फॉर एव्हर’, आणि ‘टॉप गन – मॅवरिक’ अशा चित्रपटातील गाण्यांचाही समावेश आहे. क्रांतिकारी अल्लूरी सीताराम राजू, कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरात १४०० कोटींची कमाई केली आहे. जपानमध्येसुद्धा या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली आहे. आता या गाण्याच्या नशिबात ऑस्करची ती शानदार ट्रॉफी आहे की नाही हे येणारी वेळच ठरवेल. भारतीय यासाठी चांगलेच उत्सुक आहेत.