‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा आगामी ‘आरआरआर’ हा चित्रपट बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरत आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता आहे. त्यातच आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटामध्ये अभिनेता ज्युनिअर एनटीआर याच्या भूमिकेवरील पडदादेखील दूर सारण्यात आला आहे.
राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातून दोन स्वातंत्र्यसेनानींवर भाष्य केलं जाणार असून ‘चे गेव्हेरा’च्या मोटार सायकल डायरीजवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रदर्शित झालेल्या टीझरवरुन चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याचं दिसून येत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील अलुरी सिथारामराजु व कोमराम भीम या स्वातंत्र्यवीरांवर चित्रपटाची कथा आधारित आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यासाठी त्यांनी उभारलेला लढा आणि त्यानंतर त्या लढ्याचं मोठ्या मोहिमेत झालेलं रुपांतर या टीझरमध्ये दाखविण्यात आलं आहे. विशेष बाहुबलीप्रमाणेच हा चित्रपटदेखील भव्यदिव्य असल्याचा अंदाज येत आहे.
दरम्यान, या चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारत आहे. तर त्याच्यासोबत राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, ओलिविया मॉरिस हे कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट ८ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.