बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) ने तिच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचं जे प्रकरण दाखल केलं आहे ते प्रकरण रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जॅकलिनने २०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला, त्यानंतर इतरही ज्या इतर चार्जशीट दाखल केल्या आहेत त्या रद्द करण्यसाठी दिल्ली न्यायालयात धाव घेतली असून या सगळ्याला आव्हान दिलं आहे. याचिकेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की जॅकलिनला सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अपराधाविषयी काहीही माहित नव्हतं.
जॅकलिन फर्नांडीसने मनी लाँड्रिंगशी जोडण्यात आलेल्या पीएमएलए २००० च्या अंतर्गत कुठलाही गुन्हा केलेला नाही. तसंच जॅकलीन कुठल्याही गुन्ह्यात सहभागी नव्हती. आता या प्रकरणात पुढे काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
जॅकलिनवर नेमका आरोप काय आहे?
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर हा आरोप आहे की सुकेश चंद्रशेखरशी दोस्ती झाल्यानंतर सुकेशने तिच्यावर महागड्या गिफ्ट्सची अक्षरशः बरसात केली होती. ईडीच्या माहितीनुसार सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनवर सात कोटी रुपये खर्च केले. सुकेशने तिला महागडी ज्वेलरी, चार पर्शियन मांजरी, ५७ लाख रुपयांचा घोडा हे सगळं गिफ्ट केलं होतं. त्याचप्रमाणे जॅकलिनच्या बहिणीला महागडी गिफ्ट दिली होती. बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई वडिलांना पोर्शे आणि मर्सिडीज या कारही भेट दिल्या होत्या. ज्यांची किंमत २ कोटींच्या पुढे आहे. तर जॅकलिनच्या भावाला एक एसयुव्ही आणि बहिणीला सव्वा कोटी रुपयांची BMW दिली होती. जॅकलिनच्या वतीने तिचे वकील प्रशांत पाटील हे तिची बाजू लढत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जॅकलिनला सुकेशबाबत काहीही माहीत नव्हतं. तो काय करतो ते तिला ठाऊक नव्हतं. जॅकलिनला सुकेशने हे सांगितलं होतं की तो मोठा व्यावसायिक आहे. जॅकलिन स्वतःच या प्रकरणातली पीडित आहे असंही प्रशांत पाटील यांनी म्हटलं आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.