अभिनेता अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केले आहे. आतापर्यंत आपण इतरांनी लिहिलेला आपला इतिहास वाचायचो. आता आपण भारताच्या दृष्टीकोनातून इतिहासाकडे पाहत आहोत, असे मोहन भागवत म्हणाले. मोहन भागवत शुक्रवारी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले होते. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. दरम्यान, भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड यांनी याआधीच चित्रपट करमुक्त केला आहे.
“पृथ्वीराज चौहान, मोहम्मद घोरी यांची लढाई आपण आधीच वाचली आहे. पण ते कोणीतरी लिहिले होते आणि आपण ते वाचले आहे. भारताच्या भाषेत, प्रथमच भारतात लिहिलेली रचना पाहत आहोत. आता आपण भारताचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत आणि समजून घेत आहोत आणि हीच संधी आपल्याला मिळत आहे. त्याचा परिणाम देशाच्या भविष्यासाठी निश्चितच चांगला होईल. सर्व भारतीय भारताच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी याच प्रकारे पराक्रमी होतील. मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो,” असे भागवत म्हणाले.
अमित शाहांकडूनही चित्रपटाचे कौतुक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीत ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. स्क्रिनिंग दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी या चित्रपटाच्या कलाकार आणि सदस्यांचे कौतुक केले होते. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून भारतातील सांस्कृतिक युद्धांचे चित्रण करणारा हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतल्याचे त्यांनी सांगितले. अमित शाह पुढे म्हणाले की, १३ वर्षांनंतर मी कुटुंबासह थिएटरमध्ये चित्रपट पाहत आहे. दिल्लीतील एका सिनेमागृहात त्यांनी कुटुंबातील सदस्य आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांसह हा चित्रपट पाहिला.
दरम्यान, याआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्ञानवापी प्रकरणाबाबतही भाष्य केले आहे. ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण करण्याची गरज नाही असंही स्पष्ट मत मांडलं आहे.
“कशाला वाद निर्माण करायचा? प्रत्येक मशिदीत शिवलिंगचा शोध कशासाठी घ्यायचा?,” अशी विचारणा मोहन भागवत यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना केलं.