छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटात मराठी अभिनेता संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) रायाजी ही भूमिका केली आहे. सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाशी न बोलल्याचं वक्तव्य संतोषने केलं होतं. त्यावरून त्याला ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलिंगवर स्वत: संतोष जुवेकरने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता अभिनेत्री रुचिरा जाधवनेही (Ruchira Jadhav) त्याच्यावरील ट्रोलिंगबद्दल मत व्यक्त केलं आहे. अभिनेत्रीने संतोषचं नाव न घेता आपलं मत मांडलं आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि काही मुद्देदेखील उपस्थित केले आहेत.
“आपला मराठी कलाकार” म्हणत रुचिराकडून संतोषचं कौतुक
रुचिराने असं म्हटलं आहे की, “गेल्या बऱ्याच दिवसापासून मी सोशल मीडियावर एक गोष्ट बघत आहे. मला कळत नाही आपला मराठी कलाकार एक छान बॉलीवूडचा चित्रपट करतो. त्यात छान अभिनय करतो. खरंतर त्याचं ते काम आहे. ही काही वेगळी गोष्ट नाही. त्याचं काम तो करतो आणि मनापासून करतो. तो चित्रपटही आपल्याला आवडतो आणि चित्रपटानंतर प्रोटोकॉलनुसार तो काही मुलाखती देतो. ज्यात त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीही तो छान उत्तरं देतो. एक नाही तर कधी कधी अनेक मुलाखती असतात, त्यामुळे सारखाच प्रश्न आणि सारखीच उत्तरं असू शकतात. त्यामुळे तो त्याचं काम करतो”
“तुमच्याकडे इतका वेळ आहे का?” म्हणत रुचिराने ट्रोलर्सना सुनावलं
यापुढे रुचिरा म्हणते की, “सुरुवातीला त्याच्या कामाचं कौतुक होतं आणि पण काही वेळाने त्या कौतुकाचं रुपांतर होतं ते ट्रोल्समध्ये. ते ट्रोल्सपर्यंतसुद्धा ठीक होतं. मीम किंवा काही मजामस्ती म्हणून ते ठीक होतं. पण नंतर त्याची इतकी हद्द पार होते की, एकाने काही पोस्ट टाकल्यानंतर दहा जण तेच टाकतात. सलग-सलग त्याच गोष्टी येतात आणि ते बघून असं वाटतं की, तुमच्याकडे इतका वेळ आहे का? जे कुणी हे सगळं करत आहेत त्यांच्याकडे इतका वेळ आहे का? की त्या एका व्यक्तीबद्दल वाईट बोलावं. असं काय एवढं केलं आहे त्याने की, त्याच्याबद्दल तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलत आहात. कशासाठी? जगात मुद्दे नाहीत का?”
“तुमच्याकडून चुका होत नाहीत का?” रुचिराने ट्रोलर्सना थेट सुनावलं
यापुढे रुचिराने असं म्हटलं की, “आपल्या दैनंदीन जीवनात इतक्या गोष्टी घडत आहेत. अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे. लोकसंख्या इतकी वाढत आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. रस्ते बनत आहेत. मेट्रोचं काम सुरू आहे. मान्य आहे विकास सुरू आहे आणि त्यासाठी आम्ही आता तडजोड करतच आहोत. त्याचा फायदा पुढच्या पिढीला होणार आहे. पण आता मुंबईची वाढणारी लोकसंख्या त्याबद्दल का कुणी बोलत नाही? एखादा कलाकार त्याचं काम करतोय आणि त्याने एखादी गोष्ट बोलली गेली असू शकते. गोष्टी मागेपुढे होतात. तुमच्याकडून चुका होत नाहीत का? तुम्ही फार सभ्य लोक आहात का? त्याच्यावर इतकं जे बोलत आहेत, त्यांना खरंतर आरशात बघायची गरज आहे”.
“तुम्हाला काही मुद्दे द्यायचे आहेत” म्हणत रुचिराचं ट्रोलर्सना थेट आव्हान
पुढे रुचिराने थेट आव्हान करत असं म्हटलं आहे की, “सर्व समाजसुधारकांना आणि त्या कलाकाराला जे बोलत आहेत त्यांना मला काही मुद्दे द्यायचे आहेत. एक म्हणजे मुंबईची वाढती लोकसंख्या आणि भारताचं किंवा मुंबईचं वाढतं प्रदूषण. मी आता मुंबईत राहते, त्यामुळे मुंबईच्या प्रदूषणाबद्दल जरा बोला. मला बघायचं आहे की, तुमच्या असामान्य बुद्धी आणि ज्ञानाने तुम्ही किती प्रकाश पाडू शकता. कारण तुमच्याकडे तर खूप वेळ आहे. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करून या सगळ्या गोष्टीसाठी काही करता येतं का बघा. जरा त्यातून काही तरी छान होईल असं मला वाटतं. त्यामुळे ते करा आणि हो आरसा बघायला विसरू नका”.