महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की या इतिहासाच्या पानांमधून अनेकांच्याच डोळ्यात भरणारं अभिमानाचं पान म्हणजे पेशवा बाजीराव. बाजीराव पेशव्यांच्या पात्राचा, व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव फक्त इतिहासाच्या पानांपुरताच मर्यादित न राहता बॉलिवूडनेही त्याची दखल घेतली आहे. अभिनेता रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाची लोकप्रियता आणि बाजीरावांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहता आता छोट्या पडद्यावरही लवकरच ‘पेशवा बाजीराव’ या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमामध्ये बाजीराव पेशव्यांच्या बालपणातील भूमिका साकारत आहे बालकलाकार रुद्र सोनी. नुकतेच सोनी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर’च्या मंचावर रुद्रने रुपेरी पडद्यावर बाजीराव साकारलेल्या अभिनेता रणवीर सिंगची भेट घेतली.
रुद्रने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजारीव मस्तानी’ या चित्रपटात बाजीरावांच्या मुलाची म्हणजेच नानासाहेब पेशव्यांची भूमिका साकारली होती. आता तर छोटी भूमिका साकारणारा रुद्र महत्त्वाच्या भूमिकेत म्हणजेच ‘बाजीरावांच्या’ रुपात झळकणार आहे. त्यामुळे रुद्र या भूमिकेसाठी फारच उत्सुक आहे. सोनी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर रणवीरला भेटता आल्यामुळे रुद्र फारच आनंदित आहे. यावेळी अभिनेता रणवीर सिंगने रुद्रला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचेही रुद्रने सांगितले अशी माहिती एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केली आहे.
आपल्या वाट्याला आलेल्या या भूमिकेमागे ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाची महत्त्वाची भूमिका आहे. याच चित्रपटामुळे आज इतके महत्त्वपूर्ण पात्र साकारण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे मी रणवीर सिंगचा आभारी आहे’ असेही रुद्र म्हणाला. दरम्यान ‘पेशवा बाजीराव’ हा कार्यक्रम लवकरच सोनी वाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे एका छोट्या भूमिकेमुळे रुद्रला एक मोठी संधी चालून आली आहे असेच म्हणावे लागेल. अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या कार्यक्रमामध्ये आला होता. त्यावेळी पुण्याच्या दिपाली बोरकर या बहुचर्चित चिमुकल्या डान्सरनेही रणवीरसोबत धम्माल केली. लवकरच या ‘सुपर डान्सर्स’सोबत रणवीरने केलेली ही धम्माल प्रेक्षकांना पाहता येणार आहे.