सेलिब्रिटिंच्या नावाने खोटे फेसबुक प्रोफाइल बनवणे आणि त्यावर पोस्ट करणे किंवा त्यांच्याबाबतच्या अफवा पसरवणे हा प्रकार काही नवा नाही. याचाच अनुभव चित्रपट दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि अभिनेता मिलिंद शिंदे यांना आला आहे.
सतीश राजवाडेला त्याच्या चित्रपटासाठी कलाकारांची आणि भांडवलाची गरज आहे, अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्या जात आहेत. मात्र, सतीशने या पोस्टचे खंडन केले असून, अशा पोस्टना लोकांनी भुलू नये. लोकांना सजग करण्यासाठी सतीशने फेसबुकवर असे स्टेटस पोस्ट केले आहे. “माझे सर्व प्रिय मित्र, चाहते आणि माझ्या कामाशी संलग्न असलेल्यांना माझी विनंती आहे की, मला चित्रपटासाठी कलाकारांची किंवा भांडवलाची आवश्यकता आहे अशाप्रकारच्या कोणत्याही बातम्या किंवा पोस्टना बळी पडू नका. अशा पोस्टमुळे तुमची फसवणूक करून घेऊ नका. सजग राहा, जागरुक राहा. तरीही गरज भासल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा. कोणतीही शंका मनात बाळगू नका. धन्यवाद!!” …. या शब्दांत सतीशने स्टेटस टाकले आहे. दुसरीकडे, मराठी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेता मिलिंद शिंदेला हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा पसरविण्यात आली. मिलिंद शिंदेला चित्रपटात घेण्यावरून एक निर्माता विचारत असताना त्याच्या सोबतच्या व्यक्तीने शिंदे यांना तर ह्रदयविकाराचा झटका आला आहे आणि ते कामच करू शकत नाहीत, असे सांगितले. वास्तविक मिलिंदच्या पायाला किंचितशी दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी त्याला विश्रांती घ्यायला सांगितली होती. मात्र, आता तो एकदम ठणठणीत आहे. खुद्द त्यानेच ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली.
फेसबुकवर एकाच कलाकाराची दोनपेक्षा अधिक प्रोफाइल पाहावयास मिळतात. त्यापैकी कोणते प्रोफाइल अधिकृत आहे, हे जाणून घेण्याची फेसबुक युजर्सना गरज आहे. जेणेकरून कोणत्याही खोट्या पोस्टमुळे कोणाचीही फसवणूक होणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rumours on marathi celebrities