‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटामुळे दिग्दर्शक नागराज मंजुळेची सध्या मराठीसह संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा आहे. ‘सैराट’च्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीतले सर्व रेकॉर्ड मोडणाऱया या चित्रपटातील गाण्यांसह यातील संवाद देखील तितकेच गाजत आहेत. तर समाजमाध्यमांमध्ये या चित्रपटाच्या बाबतीत काही अफवा पसरण्यास देखील सुरूवात झाली आहे. ‘सैराट’मधील संवादांवरून विनोद व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असतानाच आता दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या नावाने काही खट्याळ नेटिझन्स अफवा पसरवत आहेत.
नागराजने ‘नाम फाऊंडेशन’ला २ कोटी रुपये देगणी म्हणून दिल्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करणारे मेसेजेस व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. याशिवाय चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला नागराज प्रत्येकी १ कोटी रुपये देणार असल्याचीही अफवा पसरवली जात आहे.
‘सैराट’ चित्रपटाची निर्मिती ही झी स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनची असून नागराज मंजुळेंच्या नावाने फिरणारे मेसेजेस केवळ अफवा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader