बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच ‘रनवे ३४’ चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अजय देवगणच करत आहे. ट्रेलर प्रदर्शनानंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. नुकताच अजय देवगणनं या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत चित्रपटाविषयी बोलताना अजय म्हणाला, ‘संदीप केसवानी आणि आमिल कियान खान म्हणजेच या चित्रपटाचे लेखक दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे या चित्रपटाची कथा घेऊन आले होते. मला त्यावेळी चित्रपटाची कथा फार आवडली होती. मी सुरुवातीला या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाशी जोडला गेलो होतो. पण नंतर मी या चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाच्या निर्मितीचा निर्णयही नंतरच घेण्यात आला. पण अमिताभ बच्चन यांना या चित्रपटासाठी कास्ट करण्याचा निर्णय सर्वात आधी झाला होता.’
आणखी वाचा- प्रियांका चोप्राची मुलगी भारतात कधी येणार? बहीण परिणितीनं दिलं उत्तर
या मुलाखतीत अजयनं अमिताभ बच्चन यांच्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, ‘अमिताभ बच्चन यांनी जर या चित्रपटासाठी नकार दिला असता तर मी त्या भूमिकेसाठी दुसऱ्या कोणालाच कास्ट केलं नसतं.’ अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांनी ‘मेजर’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अमिताभ बच्चन यांचं कौतुक करताना अजय म्हणाला, ‘मी त्यांना माझ्या बालपणापासून पाहतोय. पण आतापर्यंत मी त्यांच्यासारखा मेहनती आणि प्रोफेशनल अभिनेता पाहिलेला नाही. ते ज्या एनर्जीने काम करतात ते खरंच कौतुकास्पद आहे.’
दरम्यान अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांनी ‘मेजर साब’, ‘खाकी’, ‘सत्याग्रह’, आणि ‘आग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. हे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. आता या दोघांची मुख्य भूमिका असलेला ‘रनवे ३४’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंह, बोमन ईरानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.